हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे संजय लीला भन्साळी. 1996 मध्ये 'खामोशी - द म्युझिकल' मधून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या भन्साळींनी 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'बाजीराव मस्तानी', 'गंगूबाई काठियावाडी' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन इतिहास रचला आहे.
advertisement
संजय लीला भन्साळी यांनी आज चित्रपटसृष्टीत नाव कमावलं असलं तरी त्यांचा संघर्ष खूप मोठा होता. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. भन्साळी आपल्या कुटुंबासह मुंबईतील एका चाळीत राहत होते, पण आज ते बॉलिवूडमधले टॉप दिग्दर्शक आहेत. भन्साळी यांनी गरिबी खूप जवळून पाहिली आहे. ते आपल्या आई-वडिलांसोबत चाळीत राहायचे. त्यावेळी त्यांची आई शिवणकाम करत घरखर्च भागवत असे. त्यावेळी भन्साळीही साडीला फॉल लावत आईला मदत करायचे. भन्साळी यांनी चित्रपटातुन अनेक लव्हस्टोरी दाखवल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्यांची लव्हस्टोरी मात्र अधुरीच राहिली.
संजय लीला भन्साळी आज 61 व्या वर्षी एकटेच आयुष्य जगत आहेत. त्यांनी आजवर कधीच लग्न केलं नाही. ते बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध कोरिओग्राफरच्या प्रेमात होते, पण त्यांची लव्हस्टोरी पूर्ण होऊ शकली नाही. संजय लीला भन्साळी कोरिओग्राफर वैभवी मर्चंटच्या प्रेमात होते. 'दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही चांगले मित्र झाले आणि लवकरच प्रेमात पडले.
त्यांच्या अफेअरनंतर दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या, पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही आणि संजय आणि वैभवीची प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.
वैभवी मर्चंटने अनेकदा तिच्या आणि संजय लीला भन्साळींच्या नात्याबद्दल मौन सोडलं आहे. तिने संजय यांच्यासोबतचं नातं तुटण्यामागचं कारण देखील सांगितलं होतं. याविषयी बोलताना वैभवीने 'मी आणि संजय लीला एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होतो, तेव्हाच आम्हाला आम्ही एकमेकांपासून खूप वेगळे असल्याची जाणीव झाली. आम्ही स्वतःला वेळ दिला आणि काही गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला, पण असं घडू शकलं नाही.' असा खुलासा केला होता.