सहा वर्षांची प्रतीक्षा अन् ५ लाखांचा आकडा!
शशांकने सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ शेअर करत आपली कैफियत मांडली आहे. त्याच्या दाव्यानुसार, मंदार देवस्थळी यांनी गेल्या सहा वर्षांपासून त्याचं मानधन दिलेलं नाही. हा आकडा ५ लाख रुपयांच्या घरात आहे. शशांकने कालच ४ जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक अल्टिमेटम दिला होता की, जर ५ तारखेपर्यंत पैसे मिळाले नाहीत, तर तो कायदेशीर मार्गाचा अवलंब करेल.
advertisement
दिलेली वेळ संपली आणि तरीही बँक बॅलन्समध्ये बदल न झाल्याने, शशांकने चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत देवस्थळींची पोलखोल केली आहे. "हा केवळ माझा प्रश्न नाही, तर हे कलाकारांचं शोषण आहे," अशी भावना शशांकने व्यक्त केली.
आरोपांवर मंदार देवस्थळींनी दिलेलं स्पष्टीकरण
दुसरीकडे, मंदार देवस्थळी यांनी आपली बाजू मांडताना नेहमीप्रमाणे आर्थिक चणचण आणि नुकसान झाल्याचे रडगाणे गायले आहे. मात्र, हे पहिल्यांदाच नाही की मंदार देवस्थळी यांच्यावर कलाकारांचे पैसे थकवल्याचे आरोप झाले आहेत. २०२१ मध्येच शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानीस आणि संग्राम समेळ यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही त्यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं होतं, "मला कल्पना आहे की सर्वांचे पैसे थकले आहेत. पण मी सध्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे. मला मोठा तोटा झाला असून आत्ता पैसे देण्याची माझी ताकद नाही. मी कोणाचेही पैसे बुडवणार नाही, मला फक्त थोडा वेळ हवा आहे." ही पोस्ट २१ फेब्रुवारी २०२१ ची आहे.
तेव्हाही 'वेळ हवा आहे' असंच उत्तर मिळालं होतं. अनेक वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही, हे पाहून आता संपूर्ण कलाकार मंडळींमध्ये संतापाची लाट आहे. मात्र, शशांकने यावर सडकून टीका केली आहे. "परिस्थिती खराब असणं हा तुमचा 'थापा मारण्याचा पॅटर्न' झाला आहे," असं म्हणत शशांकने सहानुभूती नाकारली आहे. सध्या परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, शशांकने केवळ बोलून न दाखवता आता वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस बजावण्याची तयारी केली आहे.
