मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे पोवाडे आजवर अनेकांनी गायले. आता यात एका नव्या गाण्याची भर पडत आहे. धाडसी, शूर, पराक्रमी अशा राजांचे स्तुतीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. 'बिग हिट मीडिया' प्रस्तुत 'शिवबाचं नाव' हे गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. सर्व सामान्य प्रजा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मधील अतूट नातं, या गाण्यातून दाखवण्यात आलंय. या गाण्यात मराठमोळा अभिनेता विशाल निकम यानं छत्रपती शिवरायांची भूमिका साकारलीये. तसेच निक शिंदे, रितेश कांबळे, विशाल फाले, तृप्ती राणे आणि वैष्णवी पाटील असे तगडे इन्सटाग्राम रील स्टार्सची टीमही या गाण्यात पाहायला मिळतेय.
advertisement
महाराजांची भूमिका आव्हानात्मक
या अल्पावधित लोकप्रिय ठरलेल्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता विशाल निकम यानं साकारली आहे. "महाराजांची भूमिका साकारनं फार जबाबदारीचं काम आहे. पण शिवरायांचा आशिर्वाद मिळतोच. त्यांच्यावरील श्रद्धा ही उर्जा देते आणि ते काम छान पार पडतं. तसंच या गाण्यातही झालं. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळतेय हे माझं भाग्य समजतो," अशा शब्दांत विशाल आपल्या भावना व्यक्त करतो.
आदर्श शिंदेंचा आवाज
दरम्यान, प्रशांत नाकती यांचे संगीत असलेले 'शिवबाचं नाव' हे गाणं निर्माते हृतिक अनिल मनी व अनुष्का अविनाश सोलवट यांनी निर्मित केलंय. हे गाणं महाराष्ट्रातील आघाडीचे गायक आदर्श शिंदे व ट्रेंडिंग गायिका म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली सोनावणे यांनी गायलंय. तर सुप्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकती व संकेत गुरव यांनी या गाण्याच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.
बिग बजेट गाणं
या गाण्याच्या दिग्दर्शनाची व छायाचित्रणाची दुहेरी जबाबदारी अभिजीत दाणी याने उत्तमरीत्या साकारली आहे. हे गाणं मराठी अल्बम सृष्टीतील सर्वात महागडं म्हणजे बिग बजेट गाणं असल्याचं म्हटलं जातं. तसचं या गाण्याच्या भव्यदिव्य चित्रिकरणाबद्दलही बरीच चर्चाही होतेय. गाण्यात जबरदस्त नृत्य, उत्साहानं भरलेलं संगीत, शिवकालीन माहौल अशा अनेक गोष्टी पाहाण्यासारख्या आहेत, असं विशाल सांगतो.
शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचा संग्रह, वाघनखांचे हे प्रकार पाहिलेत का?
परदेशातही मराठमोळ्या गाण्याचा डंका
शिवबाचं नावं हे गाणं सातासमुद्रपार पोहोचलं आहे. हे मराठमोळ गाणं शिवजयंतीनिमीत्त थेट परदेशात वाजण्यात येणार आहे. अमेरिकेतील छत्रपती फाऊंडेशनतर्फे यंदाची शिवजयंती न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासात भव्य-दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे, या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात हे गाणं शिवप्रेमींकडून वाजवण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच या गाण्यातील कलाकारांप्रमाणेच आपल्या सर्वांसाठीच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.