गिरगावमधील गुढीपाडव्याचं वातावरण दरवर्षी मुंबईकरांना मंत्रमुग्ध करतं. पण यंदा या सांस्कृतिक वातावरणात एका हायपर स्पोर्ट्स बाइकच्या आवाजाने चांगलाच व्यत्यय आणला. दरवर्षी आपल्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहणारी व्हायरल गर्ल गौरी मोरेला यावेळी मात्र पोलिसांनी जबरदस्त झापलं. भर गर्दीत बाइक रेस करणं तिला चांगलंच अंगाशी आलं आहे.
गिरगावच्या शोभायात्रेत नेमकं काय घडलं?
advertisement
गिरगावच्या अरुंद गल्ल्यांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त मोठी गर्दी जमली होती. यावेळी गौरी मोरे ही Kawasaki Ninja H2 सारख्या महागड्या आणि हायपर स्पोर्ट्स बाइकवर स्वार होऊन शोभायात्रेत सहभागी झाली होती. यावेळी गर्दीच्या मध्यभागी तिने गाडीला रेस देण्यास सुरुवात केली. या बाइकचा इंजिनचा आवाज इतका मोठा होता की, आसपासच्या लोकांच्या कानठळ्या बसल्या. अशातच तिथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील एका महिला अधिकाऱ्याने हा गोंगाट ऐकताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांनी गौरी आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला कडक शब्दांत सुनावलं.
भर गर्दीत पोलिसांनी गौरीला झापलं
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला पोलीस अधिकारी गौरीवर ओरडताना आहेत. "काय चाललंय हे? आम्ही इथे काय पागल आहोत का? गाडी आधी बाजूला घे!" या शब्दात त्यांनी तिला दम भरला. पोलिसांनी केवळ तिला झापलं नाही, तर इतक्या मोठ्या गर्दीत असा स्टंट करणं किती धोकादायक आहे, याची जाणीवही करून दिली.
स्थानिक नागरिकांचाही पारा चढला
केवळ पोलीसच नाही, तर तिथे उपस्थित असलेले मुंबईकरही या प्रकारामुळे संतापले होते. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली होती की, पोलिसांना थेट गाडीसमोर उभं राहून कारवाईचा इशारा द्यावा लागला. अखेर त्या व्हायरल गर्लला बाइकवरून खाली उतरवण्यात आलं आणि गाडी बाजूला घेण्यास भाग पाडलं.
