प्रोमो पाहिल्यानंतर सुरुवातीला हा शो बिग बॉससारखाच असावा असं वाटतं. नेटिझन्सनी तर या शोला बिग बॉसचा चुलत भाऊ म्हटलं आहे. पण बिग बॉसपेक्षा या शोमध्ये वेगळं असं काय असणार आहे, या शोची कॉन्सेप्ट जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
काय आहे हा शो?
माहितीनुसार द50 हा शो लोकप्रिय फ्रेंच शो लेस सिनक्वांटेचं इंडियन एडिशन आहे. शोची संकल्पना स्क्विड गेमपासून प्रेरित आहे, पण हिंसाचाराशिवाय. पन्नास स्टार एकाच छताखाली राहतील. त्यांच्यावर गेम मास्टर लायनचं राज्य असेल. त्यांना लायन जे काही सांगेल ते करावे लागेल.
advertisement
BBM 6 : अनुश्रीला 'भाऊचा धक्का'! प्राजक्तावर दादागिरी महागात; रितेश भाऊने दिला दणका
लायन आणि स्पर्धकांमध्ये थेट संवाद होणार नाही. सिंहाचे सहा साथीदार असतील, दोन कोल्हे, दोन ससे आणि दोन कुत्रे. त्या साथीदारांच्या मदतीने सिंह स्पर्धकांना कामं सोपवेल.
या शोमध्ये बिग बॉससारखं किचनमधील कोणतंही काम किंवा घरातील कामं नसतील. हा नातेसंबंधाचा नाही तर शक्ती, गूढता आणि मनाचा खेळ आहे. फिजिकल आणि मेंटल टास्क असतील. पराभूत झालेल्याला घराच्या एका रिकाम्या भागात राहण्यास भाग पाडलं जाईल.
शोचे नियम काय?
या शोची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात कोणतेही नियम नसतील. गेम मास्टर लायन सर्व निर्णय घेईल. स्पर्धक त्यांच्या चाहत्यांसाठी खेळतील. लायनने दिलेल्या कामांनुसार, स्पर्धकांना त्यांचे गट बदलावे लागतील. त्याच्या इच्छेनुसार कामाच्या दरम्यान नियम बदलू शकतात.
बक्षीस रक्कम शून्यापासून सुरू होईल आणि स्पर्धकांनी काम जिंकलं की वाढत जाईल. शेवटी उर्वरित एकमेव खेळाडूला विजेता घोषित केला जाईल तसंच या शोमध्ये प्रेक्षकांच्या मतदानाची कोणतीही भूमिका राहणार नाही. संपूर्ण खेळ स्पर्धकांच्या समन्वयावर आणि कामांवर अवलंबून असेल.
कोण होस्ट करणार शो?
फराह खान या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याची चर्चा आहे. पण या शोमध्ये सिंहाचा मुखवटा घातलेला द लायन म्हणून एक होस्ट दाखवण्यात आला आहे. जो राजवाड्यातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल. या शोमध्ये दुसरा कोणता होस्ट नसेल असं सांगितलं जातं आहे.
हा शो 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. ओटीटीवर तो रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टारवर असेल. टीव्हीवर रात्री 10.30 वाजता कलर्स टीव्हीवर असेल.
