महत्त्वपूर्ण निरीक्षणांची नोंद
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (DST) अखत्यारीतील स्वायत्त संस्था बिरबल सहानी पॅलिओसायन्सेस संस्थेतील (BSIP) वैज्ञानिकांच्या चमूने हा अभ्यास केला आहे. डॉ. अमृतपाल सिंह चड्ढा, डॉ. सुनीलकुमार शुक्ला आणि डॉ. अनुपम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने जीवनाच्या उगमासंबंधी पारंपरिक सिलिका-केंद्रित सिद्धांतांपासून हटत, कार्बोनेट्स—विशेषतः कॅल्शियम—च्या भूमिकेकडे लक्ष वेधले आहे.
पुगा व्हॅलीतील अत्यंत तापमानाच्या झऱ्यांमध्ये जलदगतीने होणारी कार्बोनेट निर्मिती (precipitation) त्यांनी नोंदवली. या झऱ्यांमध्ये तयार होणाऱ्या ट्रॅव्हर्टाइन (कॅल्शियम कार्बोनेटचे साठे) हे जैवपूर्व सेंद्रीय रेणू (prebiotic organic molecules) अडकवून ठेवू शकतात, असे त्यांनी निष्कर्ष काढले.
advertisement
प्रगत तंत्रांचा वापर आणि ठळक निष्कर्ष
शास्त्रज्ञांनी मायक्रोस्कोपी, GC-MS-MS, रामन स्पेक्ट्रोस्कोपी, XRD, IR आणि स्थिर समस्थानिक भू-रसायनशास्त्र (stable isotope geochemistry) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ट्रॅव्हर्टाइनचा सूक्ष्म अभ्यास केला. त्यात त्यांनी ॲमिनो ॲसिड डेरिव्हेटिव्हज, फॉर्मामाईड, सल्फर कंपाऊंड्स आणि फॅटी ॲसिड्स यांसारख्या जैवपूर्व घटकांचे अंश सापडल्याचे सांगितले.
या निष्कर्षांवरून असे सूचित होते की, कॅल्शियम कार्बोनेटने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जैविक रेणू संरक्षित ठेवण्याचे नैसर्गिक साचे म्हणून काम केले असावे. ज्यामुळे जीवनासाठी आवश्यक सेंद्रीय मूलद्रव्ये एकत्रित आणि स्थिर ठेवण्याची प्रक्रिया शक्य झाली.
मंगळासारख्या ग्रहांवरील जीवनाच्या शोधाला नवी दिशा
पुगा व्हॅलीतील कडाक्याच्या हवामानात असलेली अनोखी भू-औष्णिक क्रिया आणि तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्ग ही वैशिष्ट्ये मिळून ती “प्राकृतिक प्रीबायोटिक रिऍक्टर आणि जैवरेणूंचे संग्रहालय” ठरते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या ठिकाणची परिस्थिती प्राचीन मंगळावरील परिस्थितीसारखी असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे अशा झऱ्यांमधून तिथेही जीवनाचा उगम झाल्याचा संकेत मिळू शकतो.
BSIP च्या नव्याने स्थापन झालेल्या "Earth and Planetary Exploration Group (EPEG)" अंतर्गत हा अभ्यास करण्यात आला असून, ISROसह भविष्यातील ग्रह अन्वेषण मोहिमांसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल. जैवचिन्हे शोधण्यासाठी आणि नवीन बायोमटेरियल्स व तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही ही संशोधन दिशा निर्णायक ठरू शकते.
या संशोधनामुळे पृथीवरील जीवनाच्या उगमाचे गूढ उलगडण्याबरोबरच, अन्य ग्रहांवरील संभाव्य जीवनाचा शोधही नव्या पद्धतीने घेतला जाईल. पुगा व्हॅली आता केवळ एक पर्यटनस्थळ न राहता, जीवनाच्या शोधातील ‘जिवंत प्रयोगशाळा’ ठरू शकते.
