कल्याण येथील मलंगगडावर जाण्यासाठी मागील महिन्यात मोठा गाजावाजा करून देशातील सर्वात मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या फ्युनिक्युलर ट्रॉलीचं लोकार्पण पार पडलं होतं. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या ट्रॉलीचं लोकार्पण झालं होतं. आज मोठ्या संख्येनं यात्रेसाठी भाविक जमा झाले आहे. पण, अचानक दुपारच्या सुमारास फ्युनिक्युलर ट्रॉलीही वाटेतच बंद पडली. भाविकांनी भरलेली ट्रॉली वाटेतच बंद पडल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला.
advertisement
फ्युनिकुलर ट्रॉलीमध्ये लोकं अडकल्याची भिती वर्तवण्यात येत आहे. मलंगगडावर सध्या यात्रा सुरू आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं भााविक इथं उपस्थितीत आहे. सोमवारी देखील मंत्री आणि व्हिआयपी आले असताना फ्युनिकूलर ट्रॉली बंद पडली होती. यामुळे मोठा अपघात होऊ शकतो अशी भीती वर्तवली जात होती. अखेरीस आज क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी संख्या असल्याने ट्रॉली अडकल्याची माहिती समोर आली आहे.
कशी आहे फ्युनिक्युलर ट्रॉली?
ठाणे जिल्ह्यातील मलंगगड हे हिंदू आणि मुस्लिम भाविकांचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गडावर जाण्यासाठी आतापर्यंत भाविकांना कठीण अशी दोन तासांची चढण चढावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अतिशय त्रासदायक ठरत होता. ही अडचण लक्षात घेऊन अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्लंडच्या धर्तीवर मलंगगडावर फ्युनिक्युलर रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
फ्युनिक्युलर रेल्वे सेवा
भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी 2004 मध्ये फ्युनिक्युलर ट्रॉलीबदद्ल प्रस्ताव मांडला होता. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामाला 2012 मध्ये सुरुवात झाली. मात्र विधानसभा क्षेत्राच्या विभाजनानंतर हा प्रकल्प काही काळ रखडला होता. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नांमुळे नव्याने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आणि कामाला गती मिळाली. मागील महिन्यात जानेवारी २०२६ मध्ये फ्युनिक्युलर ट्रॉलीचं लोकार्पण पार पडलं. सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तशृंगी वणीगडाच्या धर्तीवर मलंगगड इथं फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प सुरू केला होता.
दोन डब्बे आणि १२०० प्रवाशांची क्षमता
मलंगगडावर जाण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रॉलीसाठी दोन ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. या फ्युनिक्युलर ट्रॉलीमध्ये दोन प्रशस्त डब्बे आहेत. या सेवेच्या माध्यमातून दर तासाला सुमारे 1200 प्रवासी प्रवास करू शकतात. सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीकडे फ्युनिक्युलर ट्रॉलीचं व्यवस्थापन आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी सुमारे 70 कर्मचारी तैनात आहेत.
