पिंपळखुटा येथील सरपंच गजानन पडोळे यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची शिस्त निर्माण करणे हा आहे. सध्याच्या काळात मोबाईल हे ज्ञानाचं साधन असलं, तरी त्याचा अतिरेक मुलांच्या अभ्यासावर परिणाम करत आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू करण्यात आला. मराठवाड्यात गेलो असता, तेथील एका गावात हा उपक्रम असल्याचं मी बघितलं आणि विचार केला की आपल्याही गावात आपण हा उपक्रम सुरू करायला पाहिजे. तेथून परतल्यानंतर हा प्रस्ताव मी पालकांकडे ठेवला. त्यांनी लगेच होकार दिला आणि हा उपक्रम गेले 2 महिने आमच्याकडे सुरू आहे.
advertisement
नाव 'मारामारी' पण चव एकदम भारी!'या' बाऊल फालुद्याने मुंबईकरांना लावलंय वेड Video
2 महिन्यात सकारात्मक बदल
पुढे ते सांगतात की, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत याबाबत बैठका घेण्यात आल्या. सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. गावातील विद्युत खांबावर भोंगा बसवण्यात आला असून दररोज सात वाजता आणि रात्री नऊ वाजता तो वाजवला जातो. पहिला भोंगा अभ्यास सुरू होण्याचा इशारा देतो, तर दुसरा भोंगा अभ्यासाची वेळ संपल्याची सूचना देतो.
या दोन तासांच्या कालावधीत गावातील विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतात. पालकही या वेळेत मुलांवर लक्ष ठेवतात. त्यामुळे मुलांमध्ये नियमित अभ्यासाची सवय लागली असून, शिस्त आणि एकाग्रता वाढल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. काही पालकांनी तर या उपक्रमामुळे मुलांच्या वाचन-लेखनात आणि अभ्यासातील गतीत सकारात्मक बदल दिसत असल्याचे सांगितले.
कोणत्याही सक्तीशिवाय उपक्रम सुरू
महत्त्वाची बाब म्हणजे, हा उपक्रम कोणत्याही सक्तीशिवाय राबवला जात आहे. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने मोबाईल-टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावात शांत वातावरण निर्माण होते आणि अभ्यासासाठी पोषक परिस्थिती तयार होते.या उपक्रमाची दखल गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने घेतली असून, त्यांनी पिंपळखुटा गावाला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. नियंत्रित दोन तासांत विद्यार्थी अभ्यासात मग्न असल्याचे चित्र अधिकाऱ्यांना पाहायला मिळाले.
अभ्यासाचा भोंगा या उपक्रमामुळे गावातील मुलांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि शिक्षणाविषयीची आवड वाढत आहे. पिंपळखुटा गावाने दाखवून दिले आहे की, शिक्षण ही केवळ शाळेची जबाबदारी नसून संपूर्ण गावाने एकत्र येऊन प्रयत्न केले, तर मुलांचे भविष्य घडवता येते. आज हा उपक्रम परिसरातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.





