advertisement

सायंकाळी सात वाजताच होतात मोबाईल आणि टीव्ही बंद, महाराष्ट्रातील या गावाचा कौतुकास्पद निर्णय

Last Updated:

या गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक आदर्श पाऊल उचलले आहे. या गावात दररोज संध्याकाळी ठीक सात वाजता सायरन वाजवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची आठवण करून दिली जाते. 

+
Amaravati

Amaravati News

अमरावती : मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून विचलित होत आहे. यातूनच बाहेर पडण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक आदर्श पाऊल उचलले आहे. या गावात दररोज संध्याकाळी ठीक सात वाजता सायरन वाजवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची आठवण करून दिली जाते. सायरन वाजताच संपूर्ण गावात मोबाईल आणि टीव्ही बंद केले जातात, तर सात ते नऊ हा वेळ फक्त अभ्यासासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
पिंपळखुटा येथील सरपंच गजानन पडोळे यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची शिस्त निर्माण करणे हा आहे. सध्याच्या काळात मोबाईल हे ज्ञानाचं साधन असलं, तरी त्याचा अतिरेक मुलांच्या अभ्यासावर परिणाम करत आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू करण्यात आला. मराठवाड्यात गेलो असता, तेथील एका गावात हा उपक्रम असल्याचं मी बघितलं आणि विचार केला की आपल्याही गावात आपण हा उपक्रम सुरू करायला पाहिजे. तेथून परतल्यानंतर हा प्रस्ताव मी पालकांकडे ठेवला. त्यांनी लगेच होकार दिला आणि हा उपक्रम गेले 2 महिने आमच्याकडे सुरू आहे.
advertisement
2 महिन्यात सकारात्मक बदल
पुढे ते सांगतात की, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत याबाबत बैठका घेण्यात आल्या. सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. गावातील विद्युत खांबावर भोंगा बसवण्यात आला असून दररोज सात वाजता आणि रात्री नऊ वाजता तो वाजवला जातो. पहिला भोंगा अभ्यास सुरू होण्याचा इशारा देतो, तर दुसरा भोंगा अभ्यासाची वेळ संपल्याची सूचना देतो.
advertisement
या दोन तासांच्या कालावधीत गावातील विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतात. पालकही या वेळेत मुलांवर लक्ष ठेवतात. त्यामुळे मुलांमध्ये नियमित अभ्यासाची सवय लागली असून, शिस्त आणि एकाग्रता वाढल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. काही पालकांनी तर या उपक्रमामुळे मुलांच्या वाचन-लेखनात आणि अभ्यासातील गतीत सकारात्मक बदल दिसत असल्याचे सांगितले.
कोणत्याही सक्तीशिवाय उपक्रम सुरू
महत्त्वाची बाब म्हणजे, हा उपक्रम कोणत्याही सक्तीशिवाय राबवला जात आहे. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने मोबाईल-टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावात शांत वातावरण निर्माण होते आणि अभ्यासासाठी पोषक परिस्थिती तयार होते.या उपक्रमाची दखल गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने घेतली असून, त्यांनी पिंपळखुटा गावाला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. नियंत्रित दोन तासांत विद्यार्थी अभ्यासात मग्न असल्याचे चित्र अधिकाऱ्यांना पाहायला मिळाले.
advertisement
अभ्यासाचा भोंगा या उपक्रमामुळे गावातील मुलांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि शिक्षणाविषयीची आवड वाढत आहे. पिंपळखुटा गावाने दाखवून दिले आहे की, शिक्षण ही केवळ शाळेची जबाबदारी नसून संपूर्ण गावाने एकत्र येऊन प्रयत्न केले, तर मुलांचे भविष्य घडवता येते. आज हा उपक्रम परिसरातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/अमरावती/
सायंकाळी सात वाजताच होतात मोबाईल आणि टीव्ही बंद, महाराष्ट्रातील या गावाचा कौतुकास्पद निर्णय
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement