APMC Market: जानेवारीअखेर कृषी मार्केट हाललं, सोयाबीन, तूर तेजीत; कांदा, कपाशीला किती मिळाला भाव?
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
APMC Market: कृषी मार्केटमध्ये शुक्रवारी मोठ्या घडामोडी दिसल्या. कांदा, कापूससह तूर आणि सोयाबीनची आवक आणि बाजारभाव यांबाबत जाणून घेऊ.
अमरावती: राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये आज विविध पिकांच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. काही पिकांचे बाजारभाव घसरले असतानाच काही पिकांना दिलासा देणारी दरवाढ नोंदवण्यात आली आहे. कपाशी आणि कांद्याच्या दरात घट झाली असून, सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज, 30 जानेवारी रोजी प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला? जाणून घेऊ.
कपाशीच्या दरात घट
आज राज्यभरातील कृषी बाजार समित्यांमध्ये कपाशीची एकूण 22 हजार 354 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये वर्धा बाजारात 10 हजार 100 क्विंटल कपाशीची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. या ठिकाणी कपाशीला किमान 7 हजार 625 ते कमाल 8 हजार 168 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, बुलढाणा बाजारात कपाशीला 8 हजार 305 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याची नोंद आहे. मात्र, गुरुवारीच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
advertisement
कांद्याच्या दरातही घसरण
राज्यात आज कांद्याची एकूण 3 लाख 16 हजार 516 क्विंटल इतकी मोठी आवक झाली. यामध्ये नाशिक बाजारात 1 लाख 28 हजार 876 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. या बाजारात कांद्याला किमान 401 ते कमाल 1 हजार 332 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर नागपूर बाजारात लोकल कांद्याला 2 हजार 540 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला. मात्र, गुरुवारी नोंदवलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात किंचित घट झाल्याचे दिसून आले.
advertisement
सोयाबीनच्या दरात वाढ
आज राज्यातील बाजारांत सोयाबीनची एकूण 35 हजार 588 क्विंटल इतकी आवक झाली. वाशिम बाजारात 6 हजार क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली. येथे सोयाबीनला किमान 5 हजार 325 ते कमाल 5 हजार 805 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. विशेष म्हणजे, वाशिम बाजारात पिवळ्या सोयाबीनला 6 हजार 050 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला असून, गुरुवारीच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
advertisement
तुरीच्या दरात तेजी
राज्यात आज तुरीची एकूण 42 हजार 827 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये जालना बाजारात 11 हजार 891 क्विंटल तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. येथे तुरीला किमान 7 हजार 160 ते कमाल 8 हजार 850 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, सोलापूर बाजारात तुरीला 9 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. गुरुवारच्या तुलनेत आज तुरीच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 8:10 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: जानेवारीअखेर कृषी मार्केट हाललं, सोयाबीन, तूर तेजीत; कांदा, कपाशीला किती मिळाला भाव?








