Iran War : PM मोदींचा एक फोन अन् 24 तासात भारताला दिलासा, LPG चे दोन टँकर सामुद्रधुनीतून निघाले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईबाबत भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. इराणने भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दोन एलपीजी टँकर वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईबाबत भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. इराणने भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दोन एलपीजी टँकर वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी जगातल्या सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताला तेलाचा सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला जाईल, असे संकेत दिले होते, त्यानंतर ही घडामोड समोर आली आहे.
इराणच्या राजदुतांचे संकेत
इराण नवी दिल्लीला सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देईल का? असा प्रश्न इराणच्या राजदूतांना विचारण्यात आला होता. त्यावर राजदुतांनी हो, भारत आमचा मित्र देश आहे. आम्ही ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला दोन ते तीन तासांमध्ये दिसेल. या प्रदेशात इराण आणि भारताचे समान हितसंबंध आहेत, असे आम्हाला वाटते, असं उत्तर दिलं होतं.
advertisement
भारतीय ध्वजांकित जहाज अडकली
'होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला असलेल्या पर्शियन आखातात भारतीय ध्वजांकित असलेली 24 जहाजे आहेत, ज्यात एकूण 677 भारतीय खलाशी आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेला ओमानच्या आखातात चार जहाजे होती, त्यातील एक जहाज काल हललं. आता तिथे तीन भारतीय ध्वजांकित जहाजे आहेत, ज्यात 76 भारतीय खलाशी आहेत. याव्यतिरिक्त अंदाजे 23 हजार भारतीय खलाशी आखाती देशांमध्ये जहाजांवर काम करत आहेत, यामध्ये व्यापारी जहाजे आणि ऑफशोअर जहाजे यांचा समावेश आहे', अशी माहिती भारत सरकारच्या जहाजबांधणी मंत्रालयाच्या राजेश कुमार यांनी दिली आहे.
advertisement
'इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली नाही. मार्ग अजूनही खुला आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता जहाजे जाऊ शकत नाहीत. इराणला कधीही होर्मुझची सामुद्रधुनी बंद करायची नव्हती किंवा त्यात अडथळाही आणायचा नव्हता', असं भारतातील इराणचे राजदूत डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही म्हणाले आहेत.
भारताला दिलासा मिळणार
भारतातल्या अनेक राज्यांमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी नागरिक रांगेमध्ये उभे असल्याचं चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने नागरिकांच्या घरांमध्ये एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यात आल्याचा दावा केला. तसंच लोकांनी घाबरून सिलिंडर बूक करू नये, असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं. 5 मार्चपासून घरगुती एलपीजी उत्पादनात 30 टक्क्यांची वाढ झाल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं.
advertisement
'25 हजार वितरकांपैकी कोणत्याही वितरकांकडून स्टॉक संपल्याचं वृत्त आलेलं नाही. नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं. घाबरून जाऊन खेरदी करण्याचं टाळावं', असं आवाहन सुजाता शर्मा यांनी केलं.
पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्रपतींना फोन
दरम्यान 24 तासांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. 'मी गंभीर प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी बोललो. तणाव वाढणे, नागरिकांची जीवितहानी आणि नागरी पायाभूत सुविधांना होणारे नुकसान याबद्दल मी तीव्र चिंता व्यक्त केली', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.
advertisement
'भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि अखंड ऊर्जा वाहतुकीची गरज ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मी शांतता आणि स्थिरतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि संवाद आणि राजनयिकतेचा आग्रह धरला', असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 13, 2026 11:50 PM IST
मराठी बातम्या/देश/
Iran War : PM मोदींचा एक फोन अन् 24 तासात भारताला दिलासा, LPG चे दोन टँकर सामुद्रधुनीतून निघाले!










