भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळेतील विद्यार्थिनी आणि अनेक महिला एकत्र येत त्यांनी मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. सध्या या सामुहिक लेझिम वादनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तब्बल साडेपाच मिनिटं विद्यार्थिनी आणि महिलांनी वेगवेगळे प्रात्याक्षिके सादर करून हा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
advertisement
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी हजारो महिला एकत्र येऊन लेझिम खेळण्याचा विक्रम सांगलीकरांच्या नावावर होता. त्या तब्बल 7 हजार 338 महिलांनी एकत्र येत तो विक्रम रचला होता. पण सांगलीकरांनी रचलेला विक्रम मोडित काढत महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीमध्ये ठाणे जिल्ह्यातील महिलांनी त्यांच्या नावावर विक्रम केल्याची घोषणा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. लंडनमधील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी नवीन विक्रमाची घोषणा केली आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी रवींद्र चव्हाण यांना प्रमाणपत्र आणि पदक प्रदान केले.
