नेमकं काय घडलं?
अद्वैत गीते हा शनिवारी रात्री ११ च्या सुमारास आपल्या एका मित्रासह दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गावरून कळंबणीच्या दिशेने जात होता. भरणे-शिंदेवाडी परिसरात आल्यावर अचानक दुचाकीवरील ताबा सुटला आणि गाडी महामार्गावर जोरात घसरली. दुचाकीवरून फेकले गेलेला अद्वैत रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच प्राण गेला.
advertisement
शिक्षक पुत्राच्या निधनाने तिसंगी गावावर शोककळा
अद्वैत हा नवभारत हायस्कूलचे शिक्षक प्रवीण गीते यांचा मुलगा होता. त्यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील तिसंगी आहे. अद्वैत आपल्या मित्रांसमवेत रात्रीच्या जेवणासाठी कळंबणीला जात असताना हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच भरणे आणि तिसंगी परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिक्षकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
मित्र गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला अद्वैतचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
एकुलत्या एक मुलाचा अशा प्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गावर रात्रीच्या वेळी वेगावर नियंत्रण न राहिल्याने पुन्हा एकदा एका उमद्या तरुणाचा बळी गेला आहे.
