सायनच्या त्रासावर परिणामकारी योगासने
अनुलोम विलोम (Anulom Vilom)
अनुलोम-विलोम हा प्राणायमाचा एक साधा सोपा व्यायाम आहे. यामुळे नाकपुड्या स्वच्छ व्हायला मदत होते. अनुलोम विलोम करण्यासाठी आधी एकदा उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. नंतर डावी नाकपुडी बंद करून आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. रोज फक्त 1 मिनिटं अनुलोम विलोम केल्याने चोंदलेलं नाक मोकळं होण्यापासून आणि सायनसच्या त्रासापासून तुमची सुटका होईल.
advertisement
भुजंगासन (Cobra Pose)
भुजंगासनामुळे श्वसनप्रणाली सुधारून छातीला आराम मिळतो. भुजंगासन करण्यासाठी आधी पोटावर झोपा. तुमचे हात खांद्यांखाली ठेवा. हळूहळू तुमचं शरीर वर उचला. डोकं वर करा आणि दीर्घ श्वास घ्या. तुम्हाला आराम वाटेल. हिवाळ्यात भुजंगासन दररोज करण्याने सायनसच्या त्रासापासून आराम मिळेल.
उत्तानासन (Standing Forward Bend)
उत्तानासनामुळे फक्त डोकं आणि नाकाच्या भागातला रक्त प्रवाहच वाढत नाही तर सूज देखील कमी होण्यास मदत होते. उत्तानासन करण्यासाठी सरळ उभे मग खाली वाकून गुडगे न दुमडता हातांनी पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. उत्तानासम मानसिक तणाव आणि शारीरिक थकवा दूर करण्यातही फायदेशीर आहे.
हलासन (Plow Pose)
डोक्यातील रक्तप्रवाह वाढवण्यासाठी हलासन फायद्याचं आहे. रक्तप्रवाह वाढल्याने चोंदलेलं नाक मोकळं होण्यास मदत मिळते. यामुळे डोकेदुखी आणि मळमळीच्या त्रासापासनूही सुटका होते. हलासन करण्यासाठी आधी पाठीवर झोपा. तुमचे पाय वर करून ते डोक्याच्या मागे नेण्याचा प्रयत्न करा. पायाची बोटे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. सुरूवातीला हे आसन करताना त्रास होऊ शकतो.
अधोमुख श्वानासन (Downward Dog Pose)
या आसनामुळेही रक्तप्रवाह वाढायला मदत होते. त्यामुळे श्वास घेण्यातले अडथळे दूर होतात. हे आसन करताना हात आणि पाय जमिनीवर ठेवून शरीराला इंग्रजी व्ही च्या आकारात आणण्याचा प्रयत्न करा. या आसनामुळे डोक्यापासून मानेपर्यंत रक्त प्रवाह वाढतो.
हे सुद्धा वाचा : हिवाळ्यात घरीच करा ‘ही’ योगासने; मन आणि शरीर राहील तंदुरुस्त
ही योगासने नियमित केल्यामुळे तुमची हिवाळ्यात सायनच्या त्रासापासून सुटका होईल.