जाणून घेऊयात संक्रातीच्या दिवशी तिळगुळ खाण्याचे फायदे आणि नेमकं काय कारण आहे ते.
पौराणिक कारण:
संक्रातीच्या दिवशी तिळगूळ खाण्याला एक पौराणिक, आधात्मिक कारण सुद्धा आहे. एकदा शनिदेवाने क्रोधीत होऊन आपल्या सामर्थ्याने कुंभ राशीचं घर जाळलं होतं.यानंतर त्यांचे पिता सूर्यदेव हे शनीदेवावर संतापले होते. सूर्यदेवांची माफी मागूनही त्यांचा राग काही कमी होत नव्हता. मग शनीदेवांनी तीळ आणि गुळ घेऊन सूर्यदेवांची प्रार्थना केली. यानंतर सूर्यदेवांचा राग शांत झाला. सूर्यदेवांनी शनिदेवांनासांगितलं की, ‘जेव्हा ते मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांचं घर आनंदाने भरून जाईल.’ मकर हे शनिदेवाचे आवडतं घर आहे. त्यामुळे पुराण काळापासून मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवून खाण्याची परंपरा आहे.
advertisement
हे झालं आध्यात्मिक कारण. मात्र आयुर्वेदानुसार तिळात असलेल्या अनेक औषधी गुणधर्मांमुळे तीळ खाणं हे आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं. अशातच हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवण्याची गरज असते. त्यामुळे तीळ आणि गुळ खाल्ल्याने शरीर आतून उबदार राहून विविध संक्रामित आजारांपासून आपल्या शरीराचं रक्षण होतं.
जाणून घेऊयात तिळाचे आरोग्यदायी फायदे.
तिळात कॅल्शियम,मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन बी कॉप्लेक्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. याशिवाय तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन या दोन गोष्टी असतात. तिळात असलेलं कॅल्शियम आणि झिंक हाडांसाठी चांगलं आहे. ज्यामुळे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत होऊन हाडं मजबूत होतात. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तिळ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्हाला जर हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार असतील तर फक्त संक्रातीलाच नाही तर रोज तीळ खाणं फायद्यांचं ठरतं. याशिवाय दातांच्या मजबुतीसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो. तिळाचं तेल केसांना लावल्यामुळे केसांची मुळं मजबूत होऊन केसगळतीचं प्रमाण कमी होतं.
