महाराष्ट्रातील प्रत्येक घरात सकाळी नाश्त्यासाठी बनणारा, ताईला किंवा दादाला बघायला आल्यानंतर हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पोहे किंवा कांदापोहे. पण या पोह्याची क्रेझ जशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आहे, तशीच याची क्रेझ तुम्हाला आणखी एका राज्यात पाहायला मिळते ते म्हणजे मध्यप्रदेश... पोह्यांवर असणारे प्रेम पाहायला जर जगात कुठे मिळत असेल तर याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंदौर... इंदौरमध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पोहे, शेव, जिलेबी आवडत नसेल तर तो व्यक्ती नकली इंदौरी आहे, असे गंमतीने म्हटले जाते. इंदौरच्या या पोह्यांची सातासमुद्रापार गेली आहे.
advertisement
काय सांगता! इंदौरमधील 90 टक्के लोकं पोहे खातात!
यात्रीगण कृपया ध्यान दे, इंदौर मै आपका स्वागत हैं... असे बोल कानावर पडल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टेशनच्या बाहेर पडता तेव्हा तुम्हाला या पोह्यांचा खमंग दर्वळ आपोआप दुकानाकडे घेऊन जातो. इंदौरच्या हवेत ऑक्सिजनबरोबर पोह्यांचा दर्वळ आहे, असे गंमतीने म्हटले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंदौर हे देशातील एकमेव शहर आहे जिथे 90 टक्के लोक आपल्या दिवसाची सुरुवात पोहे खाऊन करतात. इंदौरचा असा एक चौक नाही की एक गल्ली नाही जिथे तुम्हाला पोहे मिळणार नाही. विशेष म्हणजे पोहे इथे 24 तास मिळतात, दिवसाला इंदौरमध्ये जवळपास तीन ते चार टन पोहे विकले जातात. इंदौरमध्ये तसे प्रत्येक चौकात पोहे मिळातात, पण आज आम्ही तुम्हाला अशा काही जागा सांगणार आहोत, तिथे जाऊन पोहे खाणे हे शास्त्र असते.
'इथे खाणे शास्त्र असतं' असे इंदौरमधील टॉप 10 फूड स्टॉल
1. प्रशांतचे पोहे
2. 56 दुकानातील पोहे
3. पत्रकार कॉलनीतील रविचे पोहे
4.सैनी ऊसळ, स्कीम 140
5. रात्री सरवटे बस स्टँडजवळ मिळणारे पोहे
6. जेएमबी दुकानात मिळणारे पोहे
7. देवनारायणचे पोहे, अन्नपूर्णा मंदिराजवळ
8. अनंतनाद पोहे, जेल रोड
9. गुरूचे पोहे, गोराकुंड
10. विजयश्री पोहे, माणिकबागेजवळ
काय आहे इंदौरच्या पोह्यांचा इतिहास?
पुरुषोत्तम जोशी हेच ते तेच व्यक्ती आहेत ज्यांनी इंदौरमध्ये पोहे आणले. 1949-50 मध्ये केलेल्या छोट्याश्या सुरवातीमुळे इंदोरी पोहे जगभरात प्रसिद्ध झाले. पुरुषोत्तम जोशी रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील निजामपूर येथून इंदौरला आले. त्यांची आत्या इथे राहायची. त्यांना इंदूर इतके आवडले की, ते इथेच राहिले. त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली पण त्यांत त्यांचा जम बस नव्हता. अखेर त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनीच सर्वप्रथम इंदौरवासियांना पोह्याच्या दुकानाच्या माध्यमातून पोह्याची चव दिली.