कोल्हापूर : काहीतरी वेगळा खाद्यपदार्थ मिळत असेल तर कोल्हापूरकर त्या ठिकाणी नेहमीच गर्दी करत असतात. अशाच प्रकारे कोल्हापुरात एके ठिकाणी बॉम्बे वडा हा वेगवेगळ्या प्रकारे मिळतो. बॉम्बे वड्याची तीच चव वेगवेगळ्या प्रकारे खवय्यांना चाखता येते. बीबीक्यू बॉम्बे वडा, तंदूर बॉम्बे वडा या अनोख्या प्रकारांसोबतच या वडा सेंटरवर सध्या जैन लोकांसाठी खास जैन बॉम्बे वडा देखील सुरू करण्यात आला आहे.
advertisement
तिसरी पिढी विकतेय वडापाव
कोल्हापुरातील जितकर कुटुंब हे गेली 40 वर्षांपासून वडापाव बनवून विकत आहेत. त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी असलेल्या गणेश जितकर यांनी कोल्हापुरात वडापाव विकताना काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेली जवळपास 3 वर्षे कॉर्नर बॉम्बे वडा ही वडापावची गाडी कोल्हापूरच्या गुजरी परिसरात सुरू केली होती. सुरुवातीला त्यांनी फक्त साधा बॉम्बे वडा विक्रीस ठेवला होता. मात्र कोल्हापूरकरांना असणारी नवनवीन पदार्थांची आवड लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या स्टॉलवर मिळणाऱ्या वडापाव मध्ये विविधता आणली. त्यामध्ये तंदूर वडापाव, पेरीपेरी वडापाव, चीज बर्स्ट वडापाव, बीबीक्यू वडापाव असे फ्लेवर मिळतात, अशी माहिती गणेश जितकर यांनी दिली आहे.
उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड फळे खाणं योग्य की अयोग्य? पाहा आहारतज्ज्ञांचा सल्ला
वडापाव बनतो कसा?
जितकर यांच्याकडे मिळणाऱ्या बॉम्बे वड्याची चवही वेगळी आहे. वडापावला फ्लेवर्सची चव येण्यासाठी वेगवेगळे मायोनिज आणि सॉसेसचा वापर ते करतात. वडा बनवताना बटाटे उकडून त्यामध्ये आले, लसूण, मिरची, कोथंबीर असे घटक मिसळून बनवलेल्या भाजीचा वापर केला जातो. तंदूर वडापाव बनवताना पाव आणि तळलेला वडा कोळशावर पुन्हा भाजला जातो. त्यामुळे त्याला एक वेगळी चव येते, असे गणेश यांच्या वहिनी पूजा जितकर यांनी सांगितले आहे.
कोल्हापुरात मिळतेय पहिल्यांदाच कोरियन फूड; कॉर्न डॉग, फ्राईज आणि डेझर्ट खायला होतेय मोठी गर्दी Video
कोल्हापुरात पहिल्यांदाच जैन वडापाव
बऱ्याचदा जैन लोकांना वडापाव खाताना अडचण येत असते. त्यामुळेच जितकर कुटुंबांनी त्यांच्या स्टॉलवर स्पेशल जैन वडापाव सुरू केला आहे. बटाटा ऐवजी केळी उकडून घेऊन त्यामध्ये मिरचीची पेस्ट आणि थोडे मीठ मिसळून या भाजीचा वापर वडापाव बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे जैन बांधवांना देखील या ठिकाणी वडपावची चव चाखता येते, असेही गणेश जितकर यांनी सांगितले.
साधा बॉम्बे वडापाव बारा रुपये आणि जास्तीत जास्त 30 रुपयांना या ठिकाणी फ्लेवरचे वडापाव मिळतात. सुरुवातीला कोल्हापुरातील जैन मंदिरा जवळ कॉर्नर बॉम्बे वडापावची गाडी असायची. मात्र आता जितकर कुटुंबाने हा वडापावचा स्टॉल त्यांच्या घराजवळच रोज सायंकाळी 6 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत लावण्यास सुरू केले आहे.
पत्ता : कॉर्नर बॉम्बे वडा, बरोदर भवन, कोल्हापूर - 416012