या केंद्राची सुरुवात रोहिणी किल्लेदार यांच्या सासऱ्यांनी त्यांच्या मित्र विठ्ठल खरात यांच्यासोबत केली होती. त्या काळात पोळी फक्त 40 पैशांना मिळत होती, तर आज त्याच चपातीची किंमत 10 रुपये झाली आहे. काळ बदलला, चवीत नव्हे तर सातत्यात मात्र कोणतीही तडजोड झाली नाही. त्यामुळेच स्वयंपाक घर हे नाव आजही पुणेकरांच्या तोंडी कायम आहे.
advertisement
अस्सल मराठी जेवणाचा आस्वाद या ठिकाणी 100 हून अधिक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात. पाटवडी, दडपे पोहे, अळूची पातळ भाजी, मसाले भात, पुरणपोळी आणि वर्षभर मिळणारे करंजी-लाडू हे पदार्थ ग्राहकांना विशेष आवडतात. घरगुती चव हीच या केंद्राची ओळख बनली आहे. प्रत्येक पदार्थ घरच्या पद्धतीने, स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन तयार केला जातो.
38 वर्षांच्या या प्रवासात अनेक ग्राहकांच्या आठवणी या ठिकाणाशी जोडल्या गेल्या आहेत. काही ग्राहक तर पहिल्या दिवसापासून इथले जेवण घेत आहेत. जुने ग्राहक अजूनही आवर्जून भेट देतात आणि त्यांच्या प्रतिसादामुळेच आम्हाला ऊर्जा मिळते, असं रोहिणी किल्लेदार सांगतात.
फक्त जेवण पुरवण्यापुरताच हा व्यवसाय मर्यादित नाही. 80 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वयंपाक घर घरपोच डबा सेवा देते. अडचणीच्या काळात, विशेषतः कोरोना काळात, त्यांनी अनेकांना विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात डबे पुरवले. या सेवेमुळे पोळी भाजी केंद्र हे फक्त खाण्याचं ठिकाण न राहता, भावनिक नातं बनलं आहे. तीन पोळ्या आणि भाजी 50 रुपयांत इथे मिळते.
आता या व्यवसायाची तिसरी पिढी पुढे काम पाहते आहे. आधुनिक काळात झपाट्याने वाढणाऱ्या फास्टफूड संस्कृतीतही त्यांनी पारंपरिक स्वयंपाकाची चव आणि संस्कार जपले आहेत. सदाशिव पेठ हा भाग जसा पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे, तसंच स्वयंपाक घर पोळी भाजी केंद्र हे त्या परंपरेचा गंध जपणारं ठिकाण आहे. साधं पण मनापासून बनवलेलं जेवण, आत्मीयतेने दिलेली सेवा आणि वर्षानुवर्षे टिकलेली गुणवत्ता यामुळे हे ठिकाण आजही पुणेकरांच्या हृदयात आपली जागा कायम राखून आहे.





