जमुई : तुम्हीसुद्धा असे आहात का, ज्यांना थंड वातावरणात वाफाळता चहा प्यायची तल्लफ येते. परंतु जास्त चहा आरोग्यासाठी घातक असतो, हे तुम्हाला माहितच असेल. शिवाय पावसाळ्यात तर आहाराबाबत विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण चहाला पर्याय असं एक जबरदस्त ड्रिंक पाहणार आहोत.
पावसाळ्यात आरोग्याला साथीच्या आजारांचा प्रचंड धोका असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ जास्तीत जास्त खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. आज आपण जे ड्रिंक पाहणार आहोत, ते चहा किंवा कॉफीला पर्यायी आहेच, शिवाय आरोग्यासाठीही उत्तम आहे.
advertisement
हेही वाचा : पावसाळ्यात फळं खरेदीबाबत महत्त्वाच्या टिप्स; नाहीतर सोबत आणाल आजार!
प्रत्येक घरात तुळस असायलाच हवी असं म्हणतात. तुळशीचे आयुर्वेदात अनेक फायदे दिलेले आहेत. डॉ. रास बिहारी तिवारी सांगतात, तुळशीचा काढा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. कारण तुळशीत अँटिऑक्सिडंट आणि अँटिबायोटिक गुणधर्म भरपूर असतात. ज्यामुळे आजारांपासून शरिराचं रक्षण होतं. विशेषतः पोट साफ राहतं आणि अन्नपचन व्यवस्थित होतं. त्याचबरोबर चेहऱ्यावरील पिंपल आणि डागही दूर होतात. चेहरा अगदी तजेलदार आणि तुकतुकीत दिसतो. तुळशीचा काढा प्यायल्यानं साथीच्या आजारांपासूनही शरिराचं रक्षण होतं.
तुळशीचा काढा बनवणं एकदम सोपं आहे. त्यासाठी 2 कप पाण्यात 15 ते 20 तुळशीची पानं, 5 काळीमिरी, अर्धा चमचा ओवा, 1 इंच आलं, 1 ते 2 लवंग, 1 इंच कच्ची हळद, 4 ज्येष्टमध आणि 1 दालचिनी घ्यावी. हे पाणी उकळत ठेवावं. त्यात वरून ओवा, लवंग, काळीमिरी आणि दालचिनी कुटून घालावी. नंतर मीठ घालून हे मिश्रण बारीक आचेवर शिजवा. इतकं शिजू द्या की पाणी अर्ध होईल. शेवटी हे पाणी उकळून प्यावं. तुळशीचा हा काढा अनेक आजारांवर गुणकारी ठरतो. चहा किंवा कॉफीपेक्षा हा काढा घेणं उत्तम.