लखनऊ : गुडघेदुखीचा त्रास असह्य होतो. आता तर वृद्ध व्यक्तींसह 16 वर्षांच्या मुलांमध्येही हा त्रास पाहायला मिळतो. याचं मूळ कारण असतं पुरेसं ऊन न मिळणं. शिवाय सतत एसीच्या गारव्यात बसणं हेही यामागचं एक कारण असू शकतं. डॉक्टर सौरभ जैन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
डॉक्टर म्हणाले, आपल्याला कोवळं ऊन मिळतच नाही. आपली जीवनशैलीच आता अशी झालीये की, शरीर उन्हात जातच नाही. अनेक घरांमध्ये, ऑफिसेसमध्ये एसी असतो. ज्यामुळे शरिरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. हे व्हिटॅमिन कमी असलं तर हाडं कमकुवत होतात.
advertisement
हेही वाचा : अनवाणी पायांनी गवतावर चालल्यानं खरंच चष्म्याचा नंबर कमी होतो? डॉक्टर सांगतात...
आपण एकाच जागी बसल्यामुळे वजनही झपाट्यानं वाढतं. जेव्हा आरोग्यासंबंधी व्याधी उद्भवतात तेव्हा डॉक्टर वजन कमी करण्याचा सल्ला देतात. त्यानंतर अनेकजण जिम जॉइन करून ट्रेडमिलवर वेगाने धावतात. शिवाय 25 ते 30 किलो वजन एका झटक्यात उचलतात. ज्याचा परिणाम थेट गुडघ्यांवर होतो. त्यामुळे केवळ गुडघे, खांदे आणि कंबरच नाही, तर हाडंसुद्धा कमकुवत होऊ शकतात.
डॉक्टरांनी सांगितलं की, गुडघेदुखी जास्त झाल्यास ट्रान्सप्लांट करावं लागू शकतं. त्यामुळे शरिराच्या कोणत्याही भागात थोडं जरी दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्वरित डॉक्टरांची भेट घ्यावी. त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्यावे. वेळेवर उपचार मिळाले तर आपले गुडघे वाचू शकतात.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.