श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये?
यामागचे वैज्ञानिक कारण सांगताना डॉ. सारंग बहुरूपी सांगतात की, श्रावण महिना म्हणजेच या काळात पावसाळा सुरू असतो. त्यामुळे वातावरणात आर्द्रता खूप वाढलेली असते. त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो आणि पाचक अग्नी मंदावतो. त्यामुळे पचनक्रिया सुद्धा मंदावते. नॉनव्हेज जड असल्याने पचायला वेळ लागतो, त्यामुळे अपचन, ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
संसर्गजन्य रोगांचा धोका
त्याचबरोबर पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचा धोका सुद्धा अधिक असतो. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस यांचे प्रमाण वाढल्याने मासे, मटण, अंडी अशा पदार्थांमध्ये फूड पॉयझनिंग किंवा फंगल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. त्यामुळे या काळात नॉनव्हेज टाळणे फायद्याचे ठरते, असं ते सांगतात.
पुढे ते सांगतात की, एका विशिष्ट वेळेनंतर शरीराला डिटॉक्सची गरज असते. त्यासाठी श्रावण महिना हा योग्य काळ मानला जातो. मांसाहारात प्रोटीन आणि चरबीचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीर भारी होऊन अनेक समस्या निर्माण होतात. शाकाहारी आहारामुळे शरीर हलके राहून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
नैसर्गिक परिसंस्थेचा सन्मान आणि प्राणीसंवर्धनाला चालना
तसेच पावसाळा म्हणजे अनेक प्राणी आणि पक्षांचा प्रजननाचा काळ असतो. मासे अंडी घालतात. अशा काळात मांसाहार न करणे म्हणजे नैसर्गिक परिसंस्थेचा सन्मान आणि प्राणीसंवर्धनाला चालना देणे होय. त्याचबरोबर मांसाहार टाळल्याने शरीरात तनावजन्य हार्मोन्स कमी होऊन मनःशांती होते.
श्रावण महिन्यात मांसाहार टाळण्याची परंपरा ही केवळ धार्मिक नाही तर तिच्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक कारणे, तसेच आरोग्यवर्धक आणि पर्यावरणस्नेही कारणेही असल्याचं आपण बघितलं, असे डॉ. सारंग बहुरूपी सांगतात.





