सांगली - मानवाच्या आरोग्यासाठी दूध हे चांगले मानले जाते. दुधात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा मुलांना लहानपणापासूनच दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र, दुधातून नेमके कोणते घटक मिळतात? कोणते दूध सर्वात आरोग्यदायी ठरते?, याबाबत आपण आज जाणून घेऊयात.
लोकल18च्या टीमने सांगलीतील अनुभवी डॉ. सुनिता डुबल यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, "आपल्याकडे दूध हे पूर्णान्न मानल जातं. कारण दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. याशिवाय झिंक, फोलेट, प्रोटीन, व्हिटामिन 'ए' आणि व्हिटामिन 'डी' असतं, फॅट असतं. यामुळे दूध हे बहुगुणी आहे. अगदी जन्मलेल्या मुलाला आईच्या दुधाला पर्याय म्हणून सुद्धा दूधच असतं. मग ते गाई किंवा म्हशीचं आपण वापरतो.
advertisement
जन्मलेल्या मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाचा आरोग्यासाठी दूध हे उपयोगी ठरतं. प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी दूध तितकेच आरोग्यदायी आहे. एकूणच हाडांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठीही दुधाचा उपयोग होतो. म्हशीच्या दुधामध्ये फॅट जादा असते. त्यामुळे ज्यांना बीपीचा त्रास आहे अशांनी म्हशीचं दूध टाळावे. गाईचं दूध मिळणं शक्य नसेल तर म्हशीचं दूध उकळून फ्रिजमध्ये ठेवावे, दोन वेळा त्याची साय बाजूला करावी. मगच खाली राहिलेले पातळ दूध सेवन करावे.
जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तू, पुण्यातील तरुणाच्या स्टार्टअपची कमाल, 50 लाखांची उलाढाल
गाईचे दूध सर्वोत्तम मानलं जातं. त्यापैकी देशी गायीच्या दुधाला आयुर्वेदामध्ये अमृत मानलं जातं. देशी गाईच्या दुधामध्ये इतर दुधांच्या तुलनेत जाता गुण असतात. शिवाय फॅट कमी असल्याने हे दूध आरोग्यदायी ठरते. चरकसंहितेमध्ये म्हटल्याप्रमाणे, सर्व प्रकारच्या आजारांवर सक्षम असं देशी गाईचे दूध आहे. याउलट जर्सी गाईच्या दुधामुळे डायबेटिस होऊ शकतो. म्हणून जर्सी गायचं दूध टाळलं पाहिजे. देशी गाईच्या दुधाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गरोदर स्त्रियांनी देशी दुधाचे सेवन केल्यास बाळाची बुद्धी तल्लक होते, असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, कोजागिरी पौर्णिमेला दूध पिण्याच्या प्रथेबद्दल बोलायचं झालं तर कोजागिरी पौर्णिमेचे चांदणे दुधामध्ये उतरल्याने दुधामध्ये काही रासायनिक बदल होतात. यामुळे काही औषधे ही त्याच चांदणे मिश्रित दुधातून घेतली जातात. उदाहरण सांगायचे झाले तर 'अस्थमाचे वनस्पती पासून तयार केलेले औषध' होय. हे औषध कोजागिरीच्या वेळी दुधातून चांदण्यामध्ये घेतले जाते. एकूणच 'दूध हे' सर्वच वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे," असे त्या म्हणाल्या.
सूचना - ही माहिती आरोग्यतज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही. कुठलीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.