भारतीय परंपरेत ऋतूनुसार खाण्या पिण्यात बदल केले जातात, त्यात आपल्या स्वयंपाकघरांतले अनेक घटक शरीराला आतून थंड ठेवतात आणि उष्माघातापासून संरक्षण देखील करतात. कोकम सरबत, पन्हं यासारखी पेयं शरीर हायड्रेट राहण्यास मदत करतात आणि उष्माघात टाळण्यास देखील मदत होते. यात व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. जाणून घेऊया आणखी पेयांचे पर्याय.
advertisement
कोकम सरबत - कोकम सरबत बनवण्यासाठी कोकमाच्या आगळात गरजेनुसार मीठ, साखर, भाजलेल्या जिऱ्याची पूड मिसळा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ढवळा आणि प्या.
पन्हं कैरीपासून बनवलं जातं. कैरी उकडवून किंवा भाजून त्याचा गर काढला जातो. त्यात थोडी जिरं पूड, काळं मीठ आणि गूळ किंवा साखर मिसळली जाते.
सत्तू म्हणजे सातूचं पीठ. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात उन्हाळ्यातील एक लोकप्रिय पेय म्हणून सातूचं सरबत प्यायलं जातं. भाजलेल्या चण्यापासून बनवलेल्या या पीठानं शरीराला चांगली ऊर्जा मिळते.हे सरबत बनवणं खूप सोपं आहे. थंड पाण्यात दोन ते तीन चमचे सातू पीठ विरघळवा, त्यात काळं मीठ, भाजलेलं जिऱ्याची पूड आणि लिंबू पिळून घ्या. या सरबतानं तहान भागेल आणि पोट भरल्यासारखं वाटेल.
ताक - दह्यापासून बनवलेले हे पेय उन्हाळ्यातलं खास आवडतं पेय. उन्हाळ्यात आपली पचनसंस्था अनेकदा मंदावते. ताकातील प्रोबायोटिक्स पचनक्रियेला मदत करतात. थंड ताक प्यायल्यानं पोट तात्काळ थंड होतं आणि हलकं वाटतं.
बेल फळाचं सरबत - बेल फळ बाहेरून जितकं कडक तितकंच आतून जास्त फायदेशीर असतं. आयुर्वेदात, बेल फळ पोटाच्या आजारांसाठी फायदेशीर मानलं जातं. उन्हाळ्यात अनेकांना बद्धकोष्ठता किंवा अतिसाराचा त्रास होतो; अशावेळी बेल फळ सरबतानं या समस्या कमी व्हायला मदत होते. यासाठी बेलफळाचा गर पाण्यात आणि गुळामधे मिसळला जातो.
टरबूज - टरबुजामधे अंदाजे नव्वद टक्के पाणी असतं. ते फक्त एक फळ नाही तर डिहायड्रेशन भरून काढण्यासाठी एक चांगला उपाय आहे.
