हिवाळ्यात डोळ्यातून पाणी का येतं ?
तज्ज्ञांच्या मते थंडीमुळे अनेकांचे डोळे पाणावात. जेव्हा थंड हवा बुबळांवर (कॉर्निया) आदळते डोळ्यांमधून पाणी येतं. कारण सामान्य तापमानापेक्षा कॉर्नियाचं तापमान कमी होऊ नये म्हणून अश्रू येतात. त्यामुळे डोळे उबदार राहतात. डोळ्यात पाणी आल्यामुळे डोळ्यांमध्ये असलेली घाण दूर होतेच मात्र त्या बरोबरच डोळ्यांचा कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. त्यामुळे डोळे ओलावणे किंवा डोळ्यांमध्ये पाणी येणं सर्वसामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाहीये. मात्र काही कारणांमुळे तुमचे डोळे कोरडे पडू लागले किंवा त्यातून सतत पाणी येऊ लागतं. तर हा धोक्याचा इशारा ठरू शकतो. अशा वेळी थेट नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
advertisement
जाणून घेऊयात हिवाळ्यात डोळ्यांची नेमकी काळजी कशी घ्यावी आणि डोळ्यांचा कोरडेपणा, डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी कोणत्या घरगुती उपायांचा अवलंब करावा.
हिवाळ्यात डोळ्याची काळजी घेण्याचे सोपे घरगुती उपाय.
1) डोळे धुवा : कडाक्याच्या थंडीचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे ज्या भागात तापमान कमी असतं अशा व्यक्तींना जर आधीच डोळ्यांचा त्रास असेल तर त्यांचे डोळे कोरडे पडणे किंवा सतत उडत राहण्याचा त्रास त्यांना सहन करावा लागू शकतो. यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो.अशा व्यक्तींनी त्यामुळे घराबाहेर पडताना डोळे धुवायला हवेत. जेणेकरून डोळ्यांमधला ओलावा टिकून राहील आणि डोळे कोरडे पडणार नाहीत. याशिवाय बाहेरून आल्यानंतर डोळे स्वच्छ धुवून घ्या. म्हणजे डोळ्यात असलेली घाण निघून जाईल.
2) डोळे मिचकावत राहा : जर तुम्हाला सतत कॉम्प्युटर स्क्रिन समोर बसून काम करावं लागत असेल तर डोळे अधून मधून मिचकावत राहा. यामुळे डोळ्यांवर ताण कमी येतो. याशिवाय डोळे कोरडे पडण्याची समस्याही दूर होते.
3) आय ड्रॉप्सचा वापर : थंडीच्या मोसमात डोळे जास्त कोरडे होतात त्यामुळे डोळे चुरचुरण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर स्क्रीनवर जास्त वेळ काम करत असाल आणि तुमच्या डोळ्यांवर ताण येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यात आय ड्रॉप्स टाका. जेणेकरून डोळ्यांचा ओलावा कायम राहून डोळे कोरडे पडणार नाहीत
4) स्क्रीन योग्य अंतरावर ठेवा : आत्ताच्या संगणकाच्या युगात जवळपास सगळीच कामं ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर होतात.त्यामुळे कामाच्या ठिकाणी कॉम्प्युटरचा वापर हा आलाच. मात्र कॉम्प्युटरची स्क्रिन योग्य अंतरावर ठेवलीत तर डोळ्यांना त्रास होणार नाही. कॉम्प्युटर स्क्रिन आणि डोळ्यांमध्ये साधारण एक फुटाचं अंतर असणं हे फायद्याचं ठरतं.
5) कामातून विश्रांती घ्या : डिजीटल स्क्रिनसमोर बसून सतत काम करणं हे डोळ्यांसाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे एका ठाराविक अंतराने कामातून ब्रेक घ्या. स्क्रिनपासून बाजूला जा. शक्य असेल तर ऑफिसमध्येच काही पावलं चाला. यामुळे तुमच्या डोळ्यांना तर आराम मिळेलच, मात्र त्यासोबतच शरीराची हालचाल झाल्याने एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्याने वजन वाढण्याची भीती कमी होईल.
6) 20-20-20 नियमाचं पालनं करा: तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करत असला तरीही तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी 20-20-20 हा नियम खूप फायद्याचा आहे. या नियमानुसार, तुम्ही लिखाण करत असाल, काही वाचत असाल किंवा डिजीटल स्क्रिनवर काम करत असाल तर दर 20 मिनिटांनी तुमच्या कामातून नजर हटवून दुसऱ्या कोणत्याही दिशेला जिथे थेट लाईट किंवा स्क्रिन नसेल अशा ठिकाणी ठेवा. तुम्ही 20 सेकंदासाठी 20 फुटांवर असलेली एखादी गोष्ट पाहात राहा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.