डाएट मंत्रा क्लिनिक, नोएडाच्या संस्थापक आणि वरिष्ठ आहारतज्ञ कामिनी सिन्हा यांनी न्यूज18 ला दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात तापमान कमी असतं त्यामुळे हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढतं. अशा वातावरणात विषाणू, बॅक्टेरिया आणि बुरशी यांची वेगानं वाढ होते. यामुळेच या ऋतूत प्रत्येकाला ताजं अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात 3 तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेलं अन्न खाऊ नये. खरं तर या ऋतूत अनेक पदार्थ लवकर खराब होतात आणि लोकांना ते कळतही नाही. असे पदार्थ खाल्ल्याने पोटात संसर्ग पसरू शकतो.
advertisement
तुमच्याही कुंडीत लावलेलं रोप सुकून जातंय? ही एक ट्रिक वापरताच होईल हिरवंगार
याविषयी बोलताना डायटीशियन कामिनी यांनी माहिती दिली की, 'स्वयंपाक केल्यानंतर लोक ते अन्न फ्रिजमध्ये साठवतात आणि नंतर खातात. पण या ऋतूमध्ये फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न खाणं टाळावं आणि फक्त ताज्या आणि सकस आहाराचं सेवन करावं. या ऋतूत तुमची पचनक्रिया व्यवस्थित सुधारण्यासाठी गरम पदार्थांचं सेवन अधिक प्रमाणात करावं. या ऋतूत थंड पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. याशिवाय पावसाळ्यात स्वयंपाक करताना स्वच्छतेची काळजी घेऊन प्रामुख्याने स्वच्छ पाण्याचा वापर करावा. तसंच फळे आणि भाज्या नीट धुतल्यानंतरच वापराव्यात. पावसाळ्यात भाज्या स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून भाज्या त्यात धुवाव्यात, असं केल्यानं त्यावरील जीव जंतू नाहीसे होतील.
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात शरीरातील चयापचय क्रिया मंदावते आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत आजारांचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी, लोकांनी पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या दोन्ही गोष्टींना चालना देण्यासाठी लोकांनी खाण्यापिण्यात आलं, लसूण आणि लिंबू यांचा समावेश मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. तसेच या ऋतूत बाहेरचं अन्न खाणं टाळावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी. तसंच काही आरोग्याच्या समस्या असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.