पावसाळा हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ऋतू असतो. या काळात प्रकृतीची जास्त काळजी घ्यावी लागते. आजारांचं प्रमाणही पावसाळ्यातच वाढतं. अस्वच्छ साठवलेलं पाणी, गढूळ पाणी यामुळे पोटाचे विकार उद्भवतात. हगवण, कॉलरा असे आजारही यामुळे होतात. पावसाळ्यात ढगाळ हवेमुळे डासही वाढतात. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू असे घातक आजार होतात.
पावसाळ्यात ही 6 फळं खा अन् आजार पळवा दूर; इंफेक्शन पासून होईल बचाव
advertisement
पावसाळ्यात मुलांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी असते. त्यामुळे खाण्या-पिण्याबाबत थोडं जरी दुर्लक्ष झालं, तरी त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे या काळात पाणीसुद्धा स्वच्छ आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे. नाहीतर सर्दी, खोकला, ताप असे व्हायरल आजार व त्याचबरोबर डायरिया, टायफॉइड असे गंभीर आजारही होऊ शकतात. या आजारांमुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गाळून, उकळून प्यावं, तसंच घर व परिसर स्वच्छ ठेवावा.
कॉलरा – पावसाच्या अस्वच्छ पाण्यामुळे होणारा हा आजार आहे. कॉलराचा आजार झाल्यावर डिहायड्रेशन व डायरिया होऊ शकतो. ते टाळण्यासाठी स्वच्छ पाणी आणि सकस अन्न घेतलं पाहिजे.
हिपेटायटिस ए – अस्वच्छ पाण्यामुळे हिपेटायटिस ए आजाराचा धोका असतो. यात यकृताच्या आरोग्यावर अधिक परिणाम होतो. यात कावीळ, ताप, मळमळ होते.
टायफॉइड – दूषित पाणी व तशाच अन्नामुळे टायफॉइड होण्याचा धोका असतो. टायफॉइड झाला तर रोग्याच्या अंगातली शक्ती कमी होते. तसंच डेंग्यू, चिकनगुनिया अशा आजारांचा धोकाही उद्भवू शकतो.
पावसाळ्यात काय काळजी घ्यावी?
- बाहेर गेल्यावर कोणत्याही नळाचं पाणी पिऊ नये. तिथे अस्वच्छ पाणी असू शकतं. यामुळे आजार पसरण्याचा धोका जास्त असतो.
- नियमितपणे हात स्वच्छ करावेत. जेवणाआधी हात नीट धुवावेत.
- उघड्यावर ठेवलेल्या भाज्या, फळं घेतल्यास खाण्याआधी ते स्वच्छ धुवावं. यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो.
- आपल्या घरात व आजूबाजूला स्वच्छता ठेवावी. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, म्हणजे डास होणार नाहीत.
- पावसाळ्यात डासांप्रमाणेच किडे व कीटकही जास्त असतात. त्यामुळे शक्यतो अंगभर कपडे घालावेत. डास मारण्यासाठी आवश्यक ते उपाय करावेत.
- पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचतं. तसं घराजवळ कुठे साचत असेल, तर ते काढण्याचा प्रयत्न करा. बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवा.
पावसाळ्यात सकस अन्न व स्वच्छ पाणी प्यायल्यानं अनेक आजारांचा धोका टळतो. तसंच या काळात स्वच्छता राखणंही तितकंच महत्त्वाचं असतं. यामुळे अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करता येतो.