लठ्ठपणा आणि गंभीर आजारांचा धोका ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. मधुमेह आणि हृदयरोगासारख्या आजारांनाही लठ्ठपणा कारणीभूत ठरतो आहे.
'द लॅन्सेट' या वैद्यकीय जर्नलमधे नुकत्याच प्रकाशित झालेलं नवीन संशोधन संपूर्ण जगाला डोळे उघडायला लावणारं आहे. जास्त वजनामुळे संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यूचा धोका अनेक पटींनी वाढतो असं या अभ्यासात आढळून आलंय. लठ्ठपणामुळे या आजारांचा धोका 70% पर्यंत वाढू शकतो, असं अभ्यासातून समोर आलं आहे.
advertisement
Weight Management : जिम, डाएट करुनही वजन कमी होत नाही ? समजून घ्या वजनाचं गणित
फिनलंड आणि यूकेमधील 5,40,000 हून अधिक लोकांच्या या विस्तृत अभ्यासातून काही चिंताजनक तथ्यं समोर आली आहेत. संशोधकांनी सुमारे चौदा वर्ष या नागरिकांच्या आरोग्याचं निरीक्षण केलं.
70% जास्त धोका - स्थूल व्यक्तींना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा मृत्यू होण्याचा धोका निरोगी वजन असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत 70% जास्त असल्याचं आढळून आलं.
दहापैकी एक मृत्यू लठ्ठपणामुळे - जगभरात संसर्गामुळे होणाऱ्या प्रत्येक दहापैकी एक मृत्यू लठ्ठपणामुळे झाल्याचं 2023 च्या आकडेवारीमधे आढळून आलं.
आजार - लठ्ठ व्यक्तींमधे इन्फ्लूएंझा (फ्लू), न्यूमोनिया, जठराचे आजार आणि मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजेच urinary track infection यांसारखे आजार होण्याचं प्रमाण जास्त होतं. पण, एचआयव्ही आणि क्षयरोगासारख्या आजारांमध्ये हा पॅटर्न दिसून आला नाही.
भारतात आधीच न्यूमोनिया, अतिसार आणि क्षयरोग यांसारख्या संसर्गजन्य आजारांचं प्रमाण जास्त आहे. त्यात लठ्ठपणामुळे होणाऱ्या या आजारांचं प्रमाण वाढणं हे भारतासमोर दुहेरी आव्हान असल्याचं द लॅन्सेटच्या अभ्यासातल्या संशोधकांनी म्हटलंय.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, भारतातील चारपैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठ आहे. बाहेरचं खाणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागची प्रमुख कारणं आहेत.
हा अभ्यास निरीक्षणाच्या डेटावर आधारित होता. वाढत्या लठ्ठपणामुळे भविष्यात संसर्गामुळे मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका आणखी वाढू शकतो असं संशोधकांनी स्पष्ट केलंय. लठ्ठपणा आता केवळ जीवनशैलीचा आजार राहिलेला नाही, तर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आहे आणि जीवघेण्या संसर्गाचा धोका वाढतो आहे.
Bhramari :अस्वस्थ मनावर प्राचीन उपाय, भ्रामरी प्राणायमानं मन होईल शांत
भारतासारख्या देशांमधे, जिथे संसर्गाचं प्रमाण आधीच जास्त आहे, तिथे लठ्ठपणा नियंत्रित करणं ही सार्वजनिक आरोग्याची एक प्रमुख गरज बनली आहे. वजन कमी करणं केवळ तंदुरुस्त दिसण्यासाठीच नाही तर दीर्घायुष्यासाठी देखील महत्त्वाचं आहे असं संशोधकांनी म्हटलंय.
- बीएमआय तपासा: तुमचा बॉडी मास इंडेक्स जाणून घ्या. जर तो तीसच्या वर असेल तर सावध व्हा.
- पोटातील चरबीकडे लक्ष द्या - वजन सामान्य असेल पण तुमचं पोट बाहेर येत असेल, तरीही तुम्हाला धोका आहे.
- सक्रिय रहा - दररोज किमान तीस मिनिटं चालण्याची किंवा व्यायाम करण्याची सवय लावा.
- निरोगी आहार - जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. चांगला आणि परिपूर्ण आहार करा.
