जेजुरी : माऊलींच्या पालखी सोहळ्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील वारकरी सहभागी होतात. यात प्रत्येक वारकऱ्याची जेवणाची रेसीपी वेगळी आहे. नांदेड आणि मराठवाडा भागातील जम्बो चपाती प्रसिद्ध आहे. एका चपातीमध्ये पाच माणसं जेवण करतात.
विठू नामाचा, माउलींचा गजर करत लाखो वारकरी हे पंढपूरच्या दिशेनं निघाले आहे. ठिकठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक जण समोर आले आहे. काही ठिकाणी वारकऱ्यांच्या पाय चेपून दिले जात आहे, तर काही ठिकाणी वारकऱ्यांच्या जेवणांची व्यवस्था केली जात आहे. अशाच एका ठिकाणी नांदेड आणि मराठवाड्यातील माऊलींनी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी जम्बो चपाती तयार आहे. आपल्या घरी किंवा शहरांमध्ये आपण नेहमी फुलके किंवा छोट्या चपात्या पाहिल्या असतील, पण या ठिकाणी या महिला वारकऱ्यांसाठी जम्बो अशी चपाती तयार करतात. एका चपातीमध्ये पाच माणसं जेवतील अशी ही चपाती आहे.
advertisement
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्हे मुक्कामी
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्हे मुक्कामी पोहचली आहे. मंगळवारी खंडेरायाच्या जेजुरी गडावर शैव-वैष्णवांचा मेळा जमला होता. जेजुरी नगरीत माउलींच्या पालखींचं मोठ्या भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं होतं. आज सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आणि वाल्हे इथं ज्ञानोबा माउलींची पालखी मुक्कामी आहे. हजारो वारकरी पालखीसोबत विठूरायाच्या पंढरीच्या दिशेनं निघाले आहे.
उंडवडी गवळ्याची इथं तुकोबांच्या पालखीचा मुक्काम
संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरीच्या मार्गावर आहेत. आज उंडवडी गवळ्याची इथं तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आहे. मंगळवारी पालखीचा वरवंड इथं मुक्काम होता. तो मुक्काम आटपून पालखी विठूरायाच्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. टाळ मृदंगाच्या गजरात तहान - भूक विसरून भक्तीत तल्लीन झालेले वारकरी पंढरीच्या वाटेवर चालत आहे. तर जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं दौंड तालुक्यातील अवघड असा रोटी घाट पार केला. हा घाट सर करताना वारकऱ्यांनी विठू नामाचा गजर केला. तसंच संत ज्ञानेश्वर माउली आणि तुकाराम महाराजांचा जयघोष केला.