छत्रपती संभाजीनगर : दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आहे. या सणानिमित्त घरोघरी दिव्यांची आरास असतेच, सोबत खमंग फराळाचा दरवळही असतो. लाडू, करंजी, चकली, चिवडा सगळेच बनवतात, त्यासोबत एखादा वेगळा गोडाचा पदार्थ फराळाच्या ताटात ठेवायला काही हरकत नाही. तुम्ही घरच्या घरी झटपट चॉकलेट बनवू शकता. विशेष म्हणजे केवळ दिवाळीतच नाही, तर वाढदिवशी किंवा इतर कोणत्याही सणावाराला झटपट तयार होतील असे हे चॉकलेट्स आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी उर्मिला देसाई यांनी ही सोपी रेसिपी सांगितली आहे.
advertisement
चॉकलेटसाठी लागणारं साहित्य : मिल्क कंपाउंड चॉकलेट बेस, काजू, बदाम, बिस्किट वॉफल, चॉकलेट रॅपिंग पेपर, इत्यादी.
कृती : सर्वात आधी मिल्क चॉकलेट बारीक कापून मेल्ट करून घ्यायचं. मायक्रोव्हेवमध्ये मिनिटभर किंवा गॅसवर डबल बॉयलिंग मेथडने चॉकलेट सहज मेल्ट होऊ शकतं. मग साधारण 1 ते दीड मिनिट ते थंड होऊ द्यायचं. आता चॉकलेटच्या साच्यात अर्थात माउल्डमध्ये थंड झालेलं मेल्टेड चोकलेट ओतायचं. साचा पूर्ण भरायला नको कारण प्रत्येक चॉकलेटवर थर करायचे आहेत. साच्यात मेल्टेड चॉकलेटवर बिस्किट वॉफल ठेवायचं मग वर पुन्हा एक लेअर चॉकलेट ओतायचं. त्यात काजू, बदामाचे तुकडे टाकायचे. आता वरून पुन्हा एक लेयर चॉकलेट ओतून सेट होण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवायचं.
फ्रिजरमधून काढल्यानंतर आपले चॉकलेट तयार असतील. चॉकलेट रॅप करण्यासाठी बाजारात एकापेक्षा एक सुरेख पेपर मिळतात. फ्रिज झालेले चॉकलेट्स व्यवस्थित बाहेर काढून आपण डिझायनर पेपरमध्ये रॅप करू शकता.