वारंवार पिंपल्स येण्याची कारणे कोणती?
पोषक तत्वांची कमतरता किंवा हार्मोनल असंतुलनामुळं देखील त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या पिंपल्सच्या कारणांचा शोध घेणं गरजेचं असतं. हार्मोनल असंतुलन हे पिंपल्सचे सर्वात सामान्य कारण आहे. शरीरातील अँड्रोजनची पातळी वाढल्यामुळं तेल ग्रंथी जास्त सक्रिय होऊ शकतात. यामुळं त्वचेची छिद्रे बंद होतात आणि पिंपल्सची शक्यता वाढते. महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान किंवा पीसीओएसमुळं होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळं हनुवटी आणि जबड्यावर पिंपल्स येतात.
advertisement
आहार आणि तणाव देखील कारणीभूत
चेहऱ्यांवरील पिंपल्ससाठी आहार आणि तणाव देखील कारणीभूत असू शकतो. जास्त साखर आणि दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानेही पिंपल्स येऊ शकतात. या पदार्थांमुळं इन्सुलिनची पातळी वाढते आणि त्यामुळे पिंपल्स वाढतात. याशिवाय आपण तणावात असतो तेव्हा शरीर कॉर्टिसोल नावाचा हार्मोन रिलीज होतो. या हार्मोनमुळं त्वचा जास्त तेल तयार करते. तसंच, तणावामुळं झोप अपुरी राहते आणि त्वचेला दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळं पिंपल्सची समस्या आणखी गंभीर होत जाते.
पिंपल्स घालवण्यासाठी काय करावं?
पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त त्वचेची काळजी घेऊन चालणार नाही. तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात काही महत्त्वाचे बदल आणि सुधारणा करण्याची देखील गरज असते. तुमच्या आहारात साखर, रिफाइंड पीठ आणि तेलकट पदार्थांचे प्रमाण कमी करा. दुग्धजन्य पदार्थांमुळंही पिंपल्स येत असतील तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुमच्या आहारात अधिक ताजी फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
हायड्रेशन आणि झोपेवर भर द्या
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी दररोज किमान 3-4 लिटर पाणी प्या. तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचेला दुरुस्तीसाठी मदत होते. याशिवाय झोप देखील तेवढीच महत्त्वाची आहे. हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी दररोज किमान 7-8 तास गाढ झोप घ्या.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
चेहऱ्या स्वच्छ ठेवण्यासाठी इतर गोष्टींकडे देखील लक्ष देणं गरजेचं असतं. दिवसातून दोन वेळा सौम्य क्लीन्झर वापरा आणि उशीचे कव्हर नियमितपणे बदला. तुमची पिंपल्सची समस्या जास्त गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते पीसीओएस किंवा हार्मोनल असंतुलनाची तपासणी करून तुम्हाला पिंपल्ससाठी औषधी क्रीम्स देखील लिहून देऊ शकतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
