खरंतर मोदक तुटण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याची उकड (पारी) योग्य नसणे. तुमचे मोदक तुटू नयेत यासाठी 'उकड' योग्य पद्धतीने काढणे आणि मोदक वळवताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे मोदक यापुढे कधीही तुटणार नाही.
मोदकाची पारी मऊ, पातळ आणि लवचिक (Elastic) असेल तर मोदक तुटत नाहीत. यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.
advertisement
1. पाण्याचे प्रमाण अचूक ठेवा
उकड काढताना पाणी आणि तांदळाच्या पिठाचे प्रमाण अगदी अचूक असावे लागते. म्हणजे साधारणपणे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी पाणी घ्यावे.
टीप: पाणी मोजताना त्यात 1/2 चमचा तेल किंवा तूप आणि चवीनुसार मीठ नक्की घाला. यामुळे पारीला छान चमक येते आणि ती मऊ होते.
2. उकडीसाठी पीठ योग्य निवडा
मोदकासाठी वापरले जाणारे तांदळाचे पीठ पातळ (बारीक) दळलेले असावे लागते. जाडसर पीठ वापरल्यास पारीला भेगा पडू शकतात. शक्य असल्यास, बासमती किंवा आंबेमोहोर तांदळाचे पीठ वापरा, ज्यामुळे मोदकांना सुगंधही छान येतो.
3. उकड योग्य प्रकारे शिजवा
पाणी उकळल्यावरच त्यात तांदळाचे पीठ हळू हळू घाला आणि लगेच ढवळून घ्या.
गॅस लगेच बंद करून, त्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे वाफ येऊ द्या. यामुळे पीठ आतपर्यंत शिजते.
गरम उकड लगेचच परातीत काढून ती चांगली मळून घ्या. उकड कोमट असतानाच मळणे महत्त्वाचे आहे.
मोदक वळवताना घ्यावयाची काळजी
मोदक वळवताना तुटणे किंवा फाटणे हे फार सामान्य आहे. यासाठी 'उकड' मळताना आणि वळवताना काही गोष्टी लक्षात घ्या
उकड गरम असतानाच मळा, परातीत काढलेली उकड हाताला सहन होईल इतकी गरम असतानाच मळून घ्या. थंड झाल्यावर मळल्यास ती कडक होते आणि मोदक तुटतात.
उकड मळताना आणि मोदक वळवताना हाताला तेलाचा हात लावा. यामुळे पारी लवचिक राहते आणि तुटत नाही.
मोदकाची पारी शक्यतो पातळ वळा. जाड पारी वाफेवर शिजायला जास्त वेळ घेते आणि मग ती तुटण्याची शक्यता असते.
मोदक वळवल्यानंतर त्याचे टोक आणि कडा व्यवस्थित बंद करा. जर मोदक व्यवस्थित बंद न झाल्यास वाफेवर शिजताना सारण बाहेर येते आणि तो फुटतो.
