आधी जाणून घेऊयात कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ?
आपल्या शरीरात आणि रक्तात असणारा मेणासारखा चिकट पदार्थ म्हणजे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत. High Density Cholesterol (HDL) म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि Low Density Cholesterol (LDL) म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल. मुळातच आपल्या शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी कोलेस्ट्रॉल गरजेचं आहे.
advertisement
अगदी पचनापासून ते ‘व्हिटॅमिन डी’ तयार करण्यापर्यंत आणि महत्त्वाचे हार्मोन्स तयार करून ते शरीरात सोडण्यात कोलेस्ट्रॉल महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र जेव्हा शरीरात HDLम्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊन LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तेव्हा ते शरीरासाठी घातक ठरतं.
LDL कोलेस्ट्रॉल वाढल्याने काय होतं ?
आधी सांगितल्याप्रमाणे रक्तात HDL आणि LDL असे दोन्ही प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. मात्र जेव्हा LDL चं प्रमाण वाढतं तेव्हा हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतं. ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तदाबाचं प्रमाण वाढू शकतं. आपल्याला माहिती आहे की, शरीराचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला रक्त पुरवठा होणं गरजेचं असतं. मात्र रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलच्या अडथळ्यामुळे हृदयाला योग्य त्या प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि काही प्रकरणांमध्ये हृदय निकामी होऊन मृत्यूचा धोका वाढतो. याशिवाय थंडीमुळेही रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर होऊन रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो. त्यामुळे ज्यांना हृदयरोग आहे अशा व्यक्तींनी हिवाळ्यात आपल्या हृदयाची जास्त काळजी घेणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणारा आहार घेणं फायद्याचं ठरतं.
हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल का वाढतं ?
हिवाळ्यात थंडीमुळे पचनक्रियेवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे ज्यांना हृदविकार आणि पचनाच्या विकारांचा त्रास आहे, अशांनी साधा मात्र पोषक आहार घेणं फायद्याचं ठरतं. अशा आहारामुळे शरीरातल्या चांगल्या HDL कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. HDL आणि LDL हे एका सी-सॉ प्रमाणे आहेत. म्हणजे कोणत्याही एका कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की दुसऱ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपसूकच कमी होतं. त्यामुळे LDL नियंत्रित ठेवण्यासाठी HDL वाढवणं फायद्याचं ठरतं.
हिवाळ्यात टाळा हे पदार्थ
हिवाळ्यात शरीर आतून उबदार राहण्यासाठी अनेकजण तेलकट, तूपकट, तिखट पदार्थांचं सेवन करतात. यामुळे शरीर उबदार जरी राहात असलं तरीही अतिप्रमाणात असे पदार्थ खाल्ल्याचा विपरीत आणि नकारात्मक परिणाम शरीरावर आणि हृदयावर होतो. कारण यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, ज्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. त्यामुळे हिवाळ्यात जास्त प्रमाणात तूप, तेल आणि स्निग्ध पदार्थांचं सेवन केल्याने LDL वाढून हृदयविकारांचा धोका वाढतो.
हे सुद्धा वाचा : Avocado health benefits: वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करायचं आहे? मग खा ‘हे’ फळ, धमन्यातून सळसळेल रक्तप्रवाह
हिवाळ्यात खा हे पदार्थ
आहारतज्ञांच्या मते, संपूर्ण धान्य ब्रेड, पास्ता, तृणधान्य ही शरीरासाठी फायद्याची असतात. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. याशिवाय फायबर्समुळे अन्न पचायलाही मदत होते आणि पोटही दिवसभर भरलेलं राहतं. ज्यामुळे HDL कोलेस्ट्रॉल वाढून LDL कमी होतं किंवा नियंत्रणात राहतं. जंकफूडपेक्षा फळं आणि भाज्या अधिक प्रमाणात खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे होतात. दूध, दही हे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे जरी असले तरीही ते गाईच्या दुधापासून किंवा कमी फॅटस असलेल्या दुधापासून बनवलेले असेल याची काळजी घ्या. जेणेकरून तुम्ही हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवून हृदयविकार आणि हार्ट ॲटॅक टाळू शकता.