कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ?
कोलेस्ट्रॉल म्हणजे आपल्या रक्तात आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. तो आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येतात. एक हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि दुसरं म्हणजे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल (LDL). हे दोन्ही कोलेस्ट्रॉल एकमेकांना पूरक आहेत. म्हणजेच एका कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर दुसऱ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपोआपच कमी होतं. त्यामुळे जेव्हा आपल्या रक्तात चांगल्या कोलेस्ट्रॉलचं (HDL) प्रमाण कमी होतं तेव्हा आपसूकच वाईट कोलेस्ट्रॉलचं (LDL) प्रमाण वाढतं आणि जेव्हा हे वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून ते मर्यादेबाहेर जातं तेव्हा ते धोकादायक ठरू शकतं. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या धोक्यापासून वाचण्यासाठी नियमितपणे रक्त तपासणी करून घेणं फायद्याचं ठरतं.
advertisement
काय सांगतात डॉक्टर ?
सर गंगाराम रुग्णालयातील प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत यांनी न्यूज18 ला सांगितलं की, जेव्हा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी बिघडते तेव्हा अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होऊ लागतो. या स्थितीत, रक्तवाहिन्यांमधून रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हाय कोलेस्ट्रॉलमुळे, शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा योग्य पुरवठा होत नाही, ज्यामुळे त्यांच्या कार्यावर परिणाम होतो.
चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती?
डॉक्टरांनी सांगतात की, चांगलं कोलेस्ट्रॉल रक्तातील अतिरिक्त वाईट कोलेस्ट्रॉल हृदयातून काढून टाकतं आणि यकृताकडे पोहोचवते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगलं कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होत नाही. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहिल्यामुळे आजारांचा धोका टळतो. पुरुषांमध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 40 mg/dL पेक्षा जास्त आणि महिलांमध्ये 50 mg/dL पेक्षा जास्त असावं. जर चांगलं कोलेस्ट्रॉल यापेक्षा कमी असेल तर हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तर शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएलची पातळी 100 mg/dL पेक्षा कमी असावी. जर ते 160 mg/dL किंवा त्याहून अधिक असेल तर हृदयविकाराचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषध घ्यावं.