नाशिक : आजकाल अनेक लोक कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांना आवडीनुसार पाळतात. हे पाळीव प्राणी केवळ आपल्यासाठी सोबतदार नसतात तर आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भागही बनतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य बनते. थंडीच्या हंगामात त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
नाशिक येथील पशूधन अधिकारी डॉ. प्रियंका झोपोळकर यांनी लोकल 18 सोबत बोलताना थंडीत पाळीव प्राण्यांसाठी उपयोगी ठरतील असे काही खास उपाय सांगितले. चला, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया:
advertisement
1. वेळोवेळी तपासणी करा:
तुमच्या पाळीव प्राण्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. त्यांच्याबरोबर रोज थोडा वेळ खेळल्यास ते सक्रिय राहतील आणि त्यांची ऊर्जा टिकून राहील.
2. गरम पाण्याने अंघोळ घाला:
हिवाळ्यात प्राण्यांचे मऊ फर त्यांच्यासाठी नैसर्गिक इन्सुलेशन म्हणून काम करतात. त्यामुळे या दिवसांत त्यांच्या केसांची कटिंग टाळा. त्यांना गरम किंवा कोमट पाण्याने अंघोळ घाला आणि आंघोळीनंतर लगेच बाहेर नेऊ नका.
3. बाहेर जाण्याची वेळ ठरवा:
थंड वातावरणात प्राण्यांना सर्दी होऊ शकते. त्यामुळे पहाटे किंवा उशिरा रात्री त्यांना बाहेर घेऊन जाणे टाळा. दिवसा उन्हात फिरवणे अधिक योग्य ठरेल.
4. उबदार कपड्यांचा वापर करा:
जर तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी बाहेर नेत असाल, तर त्यांना उबदार, हलके कपडे घालणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळेल.
5. पाण्याची विशेष काळजी घ्या:
हिवाळ्यात पाळीव प्राणी कमी पाणी पितात. त्यामुळे त्यांना वेळोवेळी पाणी देत राहा. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी देणे फायदेशीर ठरेल.
6. त्वचेची काळजी घ्या:
थंडीत प्राण्यांची त्वचा वाळू शकते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे मॉइस्चरायझर किंवा खोबरेल तेल लावावे. त्यांचा फर स्वच्छ आणि मऊ ठेवणे आवश्यक आहे.
7. लसीकरण करा:
पाळीव प्राण्यांना वेळेवर लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर काही त्रास होत असेल, तर तातडीने जवळच्या पशूवैद्यकीय दवाखान्यात नेणे चांगले.
हिवाळ्यात प्राण्यांची काळजी का महत्त्वाची?
थंडीमुळे प्राणीही आजारी पडू शकतात. त्यांच्या आरोग्यासाठी वेळेवर काळजी घेणे, योग्य अन्न व पाणी देणे आणि त्यांना उबदार ठेवणे हे त्यांच्या निरोगी जीवनासाठी गरजेचे आहे.