वेगवेगळ्या वयोगटांमधले आणि जगाच्या वेगवेगळ्या भागांतले पुरुष आणि स्त्रिया यांच्या आजारपणाची कारणं, तसंच मृत्यूची कारणं यांचं परीक्षण या अहवालात करण्यात आलं आहे. यामध्ये स्त्रिया आणि पुरुष यांच्या आरोग्याच्या बाबतीत असलेली तफावत भरून काढण्यात गेल्या तीन दशकांमध्ये फारशी प्रगती झालेली नाही, असं आढळलं आहे.
पाठीचा खालचा भाग/कंबरदुखी, डिप्रेशन, डोकेदुखी अशा समस्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. पुरुषांमध्ये हृदयविकार, रस्ते अपघात आणि कोविड-१९ सारख्या कारणांमुळे अकाली मृत्यू होण्याचा धोका असल्याचं गेल्या काही वर्षांत आढळून आलं आहे.
advertisement
पाण्याची बाटली करेल घात, थेट तुमच्या Private Part वर होईल परिणाम, होणार नाही मूल
पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकच्या कन्सल्टंट फिजिशियन डॉ. रेखा शर्मा यांनी सांगितलं, की स्त्रिया आणि पुरुष यांच्या आरोग्याची स्थिती हा दीर्घ काळापासून संशोधन आणि चर्चेचा विषय आहे. आकडेवारीच्या दृष्टीने पाहिल्यास महिलांचं आरोग्य पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असल्याचं दिसतं. त्याला जीवशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक असे अनेक घटक कारणीभूत असून, ते गुंतागुंतीचं आहे.
जीवशास्त्रीय घटक
स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये शारीरिक/जीवशास्त्रीय फरक असल्याने त्यांच्या आरोग्याच्या स्थितीत त्यामुळे मोठा फरक पडतो. स्त्रियांना प्रजननसंस्थेशी निगडित समस्या मोठ्या प्रमाणात असतात. त्यात मासिक पाळी, गर्भधारणा, मेनोपॉझ आदींचा समावेश असतो. महिलांना ऑस्टिओपोरोसिस, ऑटोइम्यून डिसीज आणि खासकरून ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची जोखीम अधिक असते, असं डॉ. शर्मा म्हणाल्या.
सामाजिक/सांस्कृतिक प्रभाव
अनेक संस्कृतींमध्ये स्त्रिया म्हणजे कुटुंबातल्या सर्वांची काळजी घेणाऱ्या मूळ आधारस्तंभ असतात. त्यामुळे त्या स्वतःपेक्षा कुटुंबीयांची काळजी जास्त घेतात. त्यामुळे त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि असलेला आजार लक्षात न येणं किंवा बळावणं या गोष्टी घडतात.
तसंच, महिलांना अनेकदा भेदभावाला सामोरं जावं लागतं. त्यांच्यावर अत्याचारही होतात. त्याचे त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. ताण, चिंता, डिप्रेशन या समस्या महिलांना मोठ्या प्रमाणात जाणवतात आणि त्याचं कारण सामाजिक दबाव आणि असमानता हे आहे, असं डॉ. शर्मा म्हणतात.
आरोग्य सेवांची उपलब्धता आरोग्य सेवा यंत्रणेमध्ये असलेल्या पक्षपातीपणामुळे महिलांना आरोग्य सेवा मिळण्यात आणि योग्य उपचार मिळण्यात काही वेळा अडचणी येऊ शकतात. काही अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे, की महिलांना होणाऱ्या तीव्र वेदना आणि हृदयविकार यांच्याकडे पुरुषांना जाणवणाऱ्या त्याच समस्यांच्या तुलनेत गांभीर्याने पाहिलं जात नाही. त्यामुळे निदान आणि उपचारांना उशीर होऊ शकतो, असंही डॉ. शर्मा म्हणतात.
तसंच, महिलांच्या आरोग्यावरच्या संशोधनाला कायमच कमी प्राधान्य दिलं जातं, त्यासाठी पुरेसा निधी दिला जात नाही. त्यामुळे खास महिलांसाठी अशा वैशिष्ट्यपूर्ण उपचारपद्धती विकसित होण्याचं प्रमाण कमी आहे आणि जागरूकताही कमी आहे. त्यामुळे लिंगसमानतेला प्राधान्य देऊन, महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करून, त्यांना आरोग्य सेवांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर देऊन महिलांच्या आरोग्याबद्दल संशोधन होण्याची गरज आहे. त्यासाठी बहुपैलू दृष्टिकोनाची गरज व्यक्त केली जात आहे.
