खरं तर जामनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी अर्ज भरला होता.त्याच्या विरोधात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिभा झाल्टे, काँग्रेसच्या रूपाली ललमानी आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचे आव्हान होते.पण ऐनवेळी या उमेदवारांचा अर्ज बाद ठरला होता तर काहींनी माघार घेतली होती.त्यामुळे जामनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साधना महाजन बिनविरोध निवडून आल्या होत्या.
advertisement
दरम्यान आता मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडीने आमच्यावर अन्याय झाला आहे.तसेच काही उमेदवारांवर मानसिक, आर्थिक आणि शारीरिक दबाव टाकल्याचाही आरोप करत महाविकास आघाडीने जामनेर नगराध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
जळगावच्या जामनेर नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडीवर महाविकास आघाडीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशन प्रक्रियेच्या आधीच अचानक नियम बदलत उमेदवारांसाठी ‘एक’ सूचकाऐवजी ‘पाच’ सूचक अनिवार्य केल्याने अनेकांचे अर्ज अपात्र ठरले, असा मविआचा आरोप आहे.
17 नोव्हेंबरला आयोगाने एक सूचक पुरेसा असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महाविकास आघाडीचे संतोष झाल्टे व पर्यायी उमेदवार ज्योत्सना विसपुते यांनी अर्ज दाखल केले.मात्र,18 नोव्हेंबरला नियम बदलल्याने विसपुते यांचा अर्ज फेटाळला गेला. त्याच पार्श्वभूमीवर झाल्टे यांनीही अर्ज मागे घेतल्याने साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.
यासह काही उमेदवारांवर मानसिक,आर्थिक आणि शारीरिक दबाव टाकल्याचा आरोपही आघाडीने केला आहे. दिलीप खोडपे व ज्योत्सना विसपुते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयोगाचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.अन्यथा, हा निर्णय न्यायालयात आव्हान देत कायदेशीर लढा देण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योत्स्ना विसपुते आणि दिलीप खोडपे यांनी दिला आहे.
आता जर महाविकास आघाडी कोर्टात गेली आणि न्यायलयाने निवडणुकीवर काही मोठा निर्णय दिला तर गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसणार आहे.त्याचसोबत बिनविरोध पॅटर्नलाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
