जळगाव: जळगावमधून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. अशातच चोपडा तालुक्यामध्ये शिवारात दोन महिन्याची बालिकेला हिंस्त्र प्राण्याने आईच्या कुशीतून उचलून नेल्याची घटना समोर आली आहे. शेतात काही मीटर अंतरावर मांसाचे तुकडे आढळले आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे गावाच्या जंगलात दोन महिन्याची बालिकेला खाटेवर झोपलेल्या आईच्या कुशीतून उचलून नेल्याची घटना घडली. चोपडा तालुक्यातील मामलदे गावातील शेतात राजस्थानी काठेवाडी गाईंसह वास्तव्य करत आहे. रात्री खाटेवरती आईच्या कुशीत दोन महिन्याची बालिका झोपलेली होती. सकाळी जेव्हाा सगळे जण उठले तेव्हा आईजवळ बाळ न दिसल्याने खळबळ उडाली. बाळाचा संपूर्ण काठेवाडी कुटुंब शेताच्या आजूबाजूला शोध घेऊ लागले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर वास्तव्याला असलेल्या शेतापासून काही मीटर अंतरावर गव्हाची कुट्टी जवळ मांस आणि तुकडे मिळून आले. बाळाच्या आईने गावकऱ्यांना याची माहिती दिली.
पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सदर घटना शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कळल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह इतर अधिकारी तसंच फॉरेन्सिक टीम यांनी भेट देऊन माहिती घेतली.
बिबट्याने उचलून नेण्याचा संशय
प्राथमिक दृष्ट्या हिंस्र प्राण्याने बाळाला उचलून नेलं असल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं. चोपडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत बरेच जनावरे जखमी आणि मृत झाले आहे. मनुष्यहानीची घटना चोपडा तालुक्यात झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.
