पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी अंधेरी येथील रहिवासी आहे. ती आरोपी सुषमा रावच्या कार्यालयात गरम मसाला उत्पादनांच्या मार्केटिंग विक्रीसाठी पार्ट टाईम काम करत होती. सुषमाने पीडितेला सांगितले होते की, तिचे कार्यालय अंधेरी पूर्वेकडील जेबीनगर येथील एका लॉजमध्ये काही दिवसांसाठी भाड्याने घेतलेल्या खोलीत आहे. या ठिकाणी केवळ सुषमा आणि पीडिताच काम करत होती.
advertisement
गुंगीकारक औषध देऊन बेशुद्ध पाडले
काही दिवसांपूर्वी याच कार्यालयाच्या ठिकाणी सुषमाने पीडितेला शीतपेयातून गुंगीकारक औषध दिले. ते प्राशन केल्यानंतर विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्यानंतर सुषमाने तिच्या दोन साथीदारांना तेथे बोलावले. या दोन अनोळखी पुरुषांनी बेशुद्ध अवस्थेतील पीडितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे.
पीडितेला जेव्हा जाग आली, तेव्हा तिला तिच्या शेजारी ते दोन पुरुष बसलेले आढळले. त्यानंतर आरोपी सुषमाने पीडितेला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ दाखवले. हे पाहून घाबरलेल्या पीडितेने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला आणि रात्री उशिरा अंधेरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
दोन साथीदारांचा कसून शोध सुरू
पीडितेच्या तक्रारीनंतर परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी सुषमा राव आणि तिच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध सामूहिक बलात्कार, गुंगीकारक औषध देणे आणि विनयभंग आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी सुषमा रावला अटक केली आहे. अटकेनंतर तिची कसून चौकशी केली जात असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिच्या दोन फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलीस आरोपींचा माग काढत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
