नागपूर: नागपूरमधून एक चोरीची मोठी घटना घडली आहे. एका व्यावसायिकाच्या घराची रेकी करून चोरांनी घरातून तब्बल 247 तोळं सोनं आणि 65 लाख रोकड असा ४ कोटींचा मुद्देमाल लंपास केला आहे. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी ही चोरी केली आहे. चोरांनी रेकी करून घरात दरोडा टाकल्याचं समोर आलं आहे. या चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमधील राजनगर परिसरात ही घटना घडली आहे. या भागात राहणारे बलजींदर सिंह नय्यर हे व्यावसायिक आहेत. नय्यर यांच्या मुलाचे सोमवारी साक्षगंध असल्याने पूर्ण कुटुंबीय संध्याकाळी कळमेश्वर तालुक्यात गेलं होतं. नय्यर यांच्या बंगल्यात कुणी नसल्याचं पाहून चोरांनी दरोडा टाकला.
सोमवारी रात्री चोरांनी नय्यर यांच्या बंगल्यात प्रवेश केला. अज्ञात चोरट्याने स्वयंपाक घरातील खिडकीची लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लॉकरमधील 247 तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याच्या दागिन्यांचे सेट चोरट्यानं लंपास केलं. चोर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सोन्याची नाणी, ब्रेसलेट, हार सुद्धा गायब केली. तसंच घरात असलेली तब्बल 65 लाख रुपये रोख देखील चोरांच्या हाती लागले. चोरांनी सोनं आणि रोख रक्कम असा ४ कोटी रुपयांचा मला लंपास केला.
नय्यर कुटुंबीय रात्री ३ वाजताच्या सुमारास घरी परतले, घरात प्रवेश केल्यानंतर स्वयंपाक घराची खिडकी तुटल्याचं लक्षात आलं. घरात लॉकरकडे धाव घेतली असता एकच धक्का बसला. घरात घरफोडी झाल्याचा प्रकार लक्षात आला.
नय्यर यांनी तातडीने घटनेची माहिती सदर पोलीस स्टेशनला कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. नय्यर यांच्या घरातून 247 तोळे सोन्याचे दागिने, 65 लाख रोख चोरट्याने लंपास केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
रेकी करून घरावर टाकला दरोडा
नय्यर यांच्या घरात ज्या चोरांनी हा दरोडा टाकला, ते संबंधित चोरटे हे बऱ्याच दिवसांपासून नय्यर कुटुंबावर पाळत ठेवून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नय्यर कुटुंबीय जेव्हा घरातून कार्यक्रमाला गेले तेव्हाच चोरांनी दरोडा टाकला. तसंच, या चोरांना ओळखीतील कोणीतरी टीप दिल्याचा संशयही पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. यामध्ये संशयित दिसले आहे. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
