वर्धा : वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरासमोर खेळत असताना ३ वर्षांचा मुलगा नाल्यात पडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नाले तुडुंब भरून वाहत आहे आहेत. अशातच गणेश नगर भागात एक ह्रदयद्रावक घटना घडली. घरासमोर असलेल्या नालीच्या पाण्यात तीन वर्षांचा चिमुकला वाहून गेला आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे. डुगु पंकज मोहदुरे असं या चिमुकल्याचं नाव आहे.
advertisement
तीन वर्षांचा डूग्गु पंकज मोहदूरे या चिमुकला घरासमोर खेळत होता. त्याच्यासोबत दुसरं कुणीही नव्हतं. तो चालत चालत पुढे आला आणि काही कळायच्या आता नाल्यात पडला. बराच वेळ झाला तो कुठे दिसत नसल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण, तो कुठे दिसला नाही. जेव्हा नाल्याच्या बाजूला पाहिलं तर तो नाल्यात पडल्याची पाल मनात चुकचुकली. समोरच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिले असता तीन वर्षांचा डूग्गु हा नाल्यात पडल्याचं दिसून आलं.
या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पावसामुळे नाले, ओढे, नदी नाले धोकादायक पातळीवर भरून वाहत आहेत. प्रशासनाने सतत सतर्क राहण्याचं आणि विशेषतः लहान मुलांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे.