निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील सध्याचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येण्याची शक्यता आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याने ट्वीस्ट वाढवला आहे.
advertisement
राज्यसभा निवडणुकीबाबत काय म्हणाले आदित्य?
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील विकासकामांचा शुभारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही कोणतीही अधिकृत चर्चा झाली नाही. सध्या ज्या चर्चा समोर येत आहेत, त्या सध्या अफवा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, उमेदवारांबाबत विचार करताना संख्याबळाचा विचार झाला पाहिजे. महाविकास आघाडीतील रोटेशननुसार आता शिवसेनेच्या उमेदवाराची संधी असल्याची सांगत अप्रत्यक्षपणे दावा केला आहे.
महाविकास आघाडीकडे शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक २० आमदार आहेत. त्यानंतर काँग्रेसचे १४ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १० आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीत मविआचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत मविआकडून कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
