हवामान विभागाने मुंबईत आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. शनिवार आणि रविवार मुसळधारेचा इशारा देण्यात आला असून या दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 5 जिल्ह्यांमध्ये देखील धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढचे सात दिवस अति मुसळधार पाऊस राहील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
पुढील ३ तासात पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे आणि घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. असं आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. माधान गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप आलं तर अनेक घरांमध्ये पाणी, जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे.
पुढचे सात दिवस मुंबईसह आसपासचे जिल्हे, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अति मुसळधार पाऊस राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस राहील असा इशारा देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या तिन्ही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.