मान्सून परतीचा प्रवास
महाराष्ट्रातील काही भागांमधून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. 3-4 दिवसांत मान्सून जाईल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ कमजोर झालं आहे. अरबी समुद्रात पुढचे 24 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश, तामिळनाडूकडून पुन्हा एक संकट महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे. तिथे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. तिथे टर्फ तयार झालं आहे.
advertisement
पुढचे चार दिवस कसं राहील हवामान?
पश्चिम बंगालच्या उपसागरात वरच्या बाजूला महाराष्ट्राशेजारील राज्यापर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशनची टर्फ येत आहे. 10-12 ऑक्टोबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून जाणार असून ऑक्टोबर हिटच्या झळा वाढणार आहेत असा अंदाज हवामान विभागाचे तज्ज्ञ तृषाणू यांनी दिला आहे. ८ आणि 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विदर्भ वगळता हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. 10 ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्मम स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह पाऊस होईल.
ऑक्टोबर हिटच्या झळा बसणार
11 आणि 12 ऑक्टोबर रोजी मात्र महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस पूर्णपणे जाण्याची शक्यता आहे. तर ऑक्टोबर हिटच्या झळा दिसून येतील. उन्हाचा कडाका वाढेल, उष्णता वाढेल आणि घामाच्या धारा निघणार आहे. यंदा ला निनाचा परिणाम देखील डिसेंबरच्या आसपास दिसू शकतो. कडाक्याची थंडी राहणार आहे.
अवकाळी पावसाचं संकट?
पश्चिम आणि दक्षिणेकडून कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामानात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे ते वारे पुढे सरकले तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट येण्याची शक्यता आहे. आधीच परतीच्या पावसानं ओला दुष्काळसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात अवकाळीचा तडाखा बसला तर काही खरं नाही. मात्र ही पुढची स्थिती आहे.