तापमानात वाढ पण थंडीची लाट कायम
येत्या ४ दिवसांत देशातील किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर-पूर्व भारतातही पुढील दोन दिवसांनंतर तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वर जाईल. मात्र, असे असले तरी पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सध्या कोल्ड डे आणि दाट धुक्याची स्थिती आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या या थंड प्रवाहांचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तर भागात, विशेषतः विदर्भ आणि खान्देशात जाणवणार आहे.
advertisement
महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
महाराष्ट्रात सध्या संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये जेव्हा 'शीतलहरी' (Cold Wave) येतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील किमान तापमानावर होतो. आगामी ५ ते ७ दिवसांत हवामानत मोठे बदल होणार आहेत. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागात थंडीचा कडाका कायम राहील. रात्रीच्या तापमानात मोठी घट झाल्याने हुडहुडी वाढू शकते. कोकण आणि मुंबईमध्ये तापमानात थोडी वाढ होईल, ज्यामुळे थंडीचा प्रभाव कमी होऊन उबदारपणा जाणवेल.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र: या भागात सकाळच्या वेळी धुके आणि रात्री थंडी, असे विषम हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मच्छीमार आणि प्रवाशांसाठी इशारा
हवामान विभागाने बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील विशिष्ट भागांत आगामी ५ दिवस मच्छीमारांना न जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच, दाट धुक्यामुळे विमानसेवा, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना 'फॉग लाईट'चा वापर करण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्याची काळजी घ्या!
तापमानातील या बदलांमुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि मुलांनी घराबाहेर पडताना चेहरा झाकून ठेवावा आणि उबदार कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
