राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार असा मोठा संघर्ष बघायला मिळाला होता. पण आता माढ्यात हे सर्व गट एकत्र आले आहेत. इथं शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती केली आहे.
advertisement
भाजपच्या पॅनलला पराभूत करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांनी ही 'विशेष युती' उभी केली असून, यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. या नव्या युतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उद्या माढ्यातील रांझणी येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शक्तिप्रदर्शनामुळे माढ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
बार्शी पॅटर्नची पुनरावृत्ती
काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या बार्शीमध्येही अशाच प्रकारे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत भाजपविरोधात आघाडी उघडली होती. आता तोच 'बार्शी पॅटर्न' माढ्यातही पाहायला मिळत आहे. पक्षाचे झेंडे आणि विचार बाजूला ठेवून केवळ भाजपला रोखणे, हाच या युतीचा मुख्य अजेंडा असल्याचं दिसत आहे.
