खरं तर, काही दिवसांपूर्वी दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. याचा निषेध महारुद्र पाटील यांनी केला होता. तसेच भरणे यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याच कारणातून हनुमंतराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत महारुद्र पाटील यांना मारहाण करण्याची धमकी दिली. पाटील यांना हाताखालून काढणार असल्याचं त्यांनी ऑन कॅमेरा सांगितलं. या प्रकारानंतर महारुद्र पाटील यांनी इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
advertisement
कोकाटे यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांचा सावकारकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या छळाला कंटाळून २०१७ मध्ये माणिकराव जगदाळे यांनी आत्महत्या केली होती. तसेच कोकाटे यांनी २०२४ च्या निवडणुकीच्या काळात देखील महारुद्र पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. तू जर अमुक अमुक उमेदवाराचा प्रचार केला तर तुझं बरं वाईट करेल, अशी धमकी कोकाटेंनी दिल्याचं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
या प्रकारानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत हनुमंतराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे समर्थक हणुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय या पद्धतीने सराईतासारखी जाहीर धमकी देण्याचे धाडस कोणताही जबाबदार राजकीय नेता करू शकणार नाही. महारुद्र पाटील हे एक जबाबदार पदाधिकारी असून गेली अनेक वर्षे ते राजकारण तथा समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांना 'ऑन कॅमेरा' धमकी देण्याचे धाडस करणाऱ्या कोकाटेंवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. माझी पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण यांना विनंती आहे की कृपया आपण या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, असं सुप्रिया सुळेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.