गेल्या पन्नास वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या बबनराव घोलप यांना आता आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी बबनराव घोलप तयारी करत होते. मात्र, ज्या भाऊसाहेब वाकचौरेंनी 2014 साली शिवसेनेचे शिवबंधन तोडून काँग्रेसचा हात धरला होता. त्याच वाकचौरेंना पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिला गेला. त्यामुळे नाराज झालेल्या बबनराव घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली होती.
advertisement
उद्धव ठाकरेंनी घोलप यांना शिर्डी लोकसभेच्या कामाला लागा अशा सुचना केल्यानंतर गेल्या एक दीड वर्षापासून बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र वाकचौरेंना प्रवेश देऊन घोलप यांच्याकडे असलेले अहमदनगर संपर्कप्रमुख पद काढून घेतल्याने बबनराव घोलप अस्वस्थ झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी बबनराव घोलप यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. यावर उद्धव ठाकरेंची भेट घालून देणार असल्याचं आश्वासनही राऊत यांनी दिलं होतं.
वाचा - 'इथे 'ठाकरेंचा' राज चालतो'; नाशिकमधील कार्यक्रमावरुन मनसेचा हिंदी भाषिकांना इशारा
दरम्यान बबनराव घोलप यांची ऊद्धव ठाकरेंची भेट होण्यापुर्वीच येत्या रविवारी बबनराव घोलप यांनी चलो मुंबईचा नारा दिला असून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शिवाजी पार्क येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होत मेळावा घेणार आहेत. घरवापसी केलेल्या वाकचौरेंनी ठाकरेंच्या सुचनेनुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघात कामाला सुरूवात केली असून घोलपांच्या नाराजीबद्दल माहीत नसल्याचं म्हटलं आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अजूनही ठाकरे गटातून आऊटगोईंग सुरूच असून आता बबनराव घोलपही नाराज झाले असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मेळाव्यात ते आपली काही वेगळी भुमिका जाहीर करतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.