नेमकं कारण काय?
संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ च्या उमेदवारीवरून हा वाद उफाळून आला आहे. एमआयएम पक्षाने मोहम्मद इसरार यांना या प्रभागातून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं. पक्षाचा हा निर्णय मोहम्मद इसरार यांच्या समर्थकांसाठी आनंदाची बातमी ठरली, तर दुसऱ्या गटासाठी तो संतापाचा विषय बनला. मोहम्मद इसरार यांच्या उमेदवारीचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी शहरात एका भव्य रॅलीचं आयोजन केलं होतं.
advertisement
रॅली किराडपुऱ्यात पोहोचताच राडा
मोहम्मद इसरार यांची रॅली वाजतगाजत किराडपुरा परिसरात पोहोचली. याच प्रभागातून हाजी इसाक हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक होते. ही रॅली किराडपुरात येताच हाजी इसाक यांच्या समर्थकांनी ती अडवली आणि घोषणाबाजी सुरू केली.
सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची आणि शाब्दिक चकमक झाली. मात्र, काही क्षणातच या वादाने हिंसक वळण घेतले. दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि तिथेच तुंबळ हाणामारी सुरू झाली. भररस्त्यात सुरू असलेल्या या राड्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं. यावेळी हाजी इसाक यांच्या कार्यकर्त्यांनी मोहम्मद इसरार यांनाही मारहाण केली. त्यांनी इसरार यांच्या गळ्यातील हार तोडून टाकत ही मारहाण केली. पण यावेळी इसरार यांचे कार्यकर्ते मध्ये पडले आणि घटनास्थळी तुंबळ हाणामारी झाली.
परिसरात तणावपूर्ण शांतता
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गर्दी पांगवली. सध्या किराडपुरा परिसरात परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे. एकाच पक्षाच्या दोन गटांमधील या गटबाजीमुळे पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
