छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आला आहे. भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअरगन आढळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एक संशयास्पद बॅग आढळून आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बॅग तपासली असता त्यामध्ये एअरगन असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब तात्काळ पोलिसांना कळवण्यात आली. माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बॅग आणि एअरगन ताब्यात घेतली. प्राथमिक तपासात ही एअरगन प्रत्यक्ष गोळीबारासाठी वापरली जाणारी नसली तरी ती धोकादायक ठरू शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
advertisement
CCTV मध्ये आरोपीची ओळख पटली
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक तरुण संशयास्पदरीत्या बॅग ठेवून निघून जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. रितेश संतोष होळकर असे या तरुणाचे नाव असून त्याला क्रांती चौक पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले.
सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश होळकर याची आतापर्यंत कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळून आलेली नाही. मात्र, त्याने आमदारांच्या कार्यालयात एअरगन का ठेवली, त्यामागचा उद्देश काय होता, तो कोणाच्या संपर्कात होता, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे शहरात राजकीय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, रितेश संतोष होळकर याच्या विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आमदार संजय केनेकर यांच्या सुरक्षेबाबतही पोलीस अधिक सतर्क झाले असून कार्यालय परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण प्रकाराचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
