राज्यातील २९ महापालिकाच्या महापौर पदाची आरक्षण सोडत मुंबईत पार पडली. पुणे महापालिका महापौरपदावर खुल्या प्रवर्गातील महिला यंदा विराजमान होईल. आरक्षण प्रक्रियेनंतर भाजपमधील अनेक महिला नगरसेवकांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आली आहे. त्यापैकी मंजुषा नागपुरे, निवेदिता एकबोटे, मंजुश्री खर्डेकर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या ऐश्वर्या पठारे यांच्या नावाची चर्चा आहे.
advertisement
कोण आहेत ऐश्वर्या पठारे?
महापौरपदाच्या शर्यतीत अचानक वडगाव शेरीतून आठ नगरसेवक निवडून आणणाऱ्या पठारे कुटूंबातल्या ऐश्वर्या पठारे यांचे नाव स्पर्धेत पुढे आले आहे. ऐश्वर्या पठारे या विमाननगर लोहगाव प्रभागातून निवडून आल्या आहेत. ऐश्वर्या पठारे या उच्चशिक्षित नगरसेविका असून त्यांचे पती सुरेंद्र पठारेही नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांचे सासरे बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ऐश्वर्या पठारे आणि त्यांचे पती सुरेंद्र पठारे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच भाजपनेही प्रवेश केल्याबरोबर त्यांना उमेदवारीची घोषणा केली. भाजप निष्ठावंतांनी पक्षाच्या निर्णयावर मोठी नाराजी व्यक्त केली होती. परंतु ऐश्वर्या पठारे आणि सुरेंद्र पठारे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून पुणे महापालिका सभागृहात पाऊल ठेवले आहे.
महिला आरक्षणाने अनेक दिग्गजांना धक्का
पुणे महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेला आरक्षण निश्चित झाल्याने गणेश बीडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भीमाले, राजेंद्र शिळीमकर, किरण दगडे पाटील आदी दिग्गजांना नेत्यांना धक्का बसला. भाजपचे पहिल्या फळीतील नेते महापौरपदाकडे आस लावून बसलेले असताना महिला आरक्षण निश्चित झाल्याने अनेकांना हिरमोड झाला.
